अचलपुरात रस्त्यांची खस्ता हालत

By Admin | Updated: July 28, 2015 01:00 IST2015-07-28T01:00:28+5:302015-07-28T01:00:28+5:30

'स्लम' वॉर्डांत घरकूल निधी योजनेंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चरची कामे झाली आहेत. लाखो रूपये खर्चून करण्यात आलेले सिमेंट काँक्रीट ...

Road condition in the Achalpur | अचलपुरात रस्त्यांची खस्ता हालत

अचलपुरात रस्त्यांची खस्ता हालत

न्यायालयात जाणार : नगरसेवकांची आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
सुनील देशपांडे अचलपूर
'स्लम' वॉर्डांत घरकूल निधी योजनेंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चरची कामे झाली आहेत. लाखो रूपये खर्चून करण्यात आलेले सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व नाला बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून याकडे संबंधित नगरपालिका पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. या कामावर न.प. चा एकही कर्मचारी किंवा अभियंता पाहणी करताना या भागातील लोकांना दिसला नसल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
अचलपूर येथील प्रभाग क्रमांक १० मधील अब्बासपुरा या दलित वस्तीत इन्फ्रास्ट्रक्चरची कामे घरकूल निधीअंतर्गत झाली आहेत. त्यात झालेले सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे व नाला बांधकामाचे काम खामगाव येथील ठेकेदाराला देण्यात आलेले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने फार काळ टिकणे शक्य नाही, याबाबत नगरसेवक प्रफुल्ल महाजन यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांचेकडे एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार देऊनही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वॉलिटी कंट्रोलकडून तपासून नंतर कंत्राटदाराचे बिल द्यावे, अशी मागणी केली आहे. याबाबत नगरसेवक प्रफुल्ल महाजन यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त यांना तक्रार दिली आहे. यामध्ये ढेंगे यांच्या घरापासून जगदंब महाविद्यालयापर्यंत लाखो रूपये किमतीचा नाला बांधण्यात आला. या नाल्याच्या बेडची दबाई व्यवस्थित झाली नसून काळ्या दगडाच्या गिट्टीऐवजी हार्ड मुरुमाची गिट्टी वापरली आहे. त्यात सिमेंटचे प्रमाण अल्प होते. पाण्याचे क्युरींगही झाले नाही. प्रथम ४०-५० फुटाचे काम सुरू असताना बाहेरून मशीनने मिक्चर करून माल आणण्यात येत होता. परंतु साईटवर आणल्यावर तो जमिनीवर मातीमध्ये टाकण्यात येत होता. तोच माल मातीसह उचलून नाल्याच्या साईड वॉलमध्ये वापरण्यात आला. साईडच्या उंच भिंतींना लोखंडी प्लेट एकाच बाजूने लावण्यात आल्या. काही दिवसानंतर काँक्रीट जमिनीवर तयार करण्यात आले तो माल मातीसह वापरण्यात आल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रशन निर्माण झाला आहे.

रस्त्याचेही काम निकृष्ट
जगदंब शाळा ते देवी मंदिरपर्यंत आर.सी.सी. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्त्यावरील असलेले डांबरावर पॅचेस न मारता काँक्रीट टाकण्यात आले. या गिट्टी व रेतीचे प्रमाण अधिक तर सिमेंट कमी होते. तांत्रिकदृष्ट्या व चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून हा रस्ता केलेला नाही. या दोन्ही कामांची चौकशी झाल्याशिवाय बिल प्रदान करू नये, अन्यथा न्यायालयात दावा करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रफुल्ल महाजन यांनी दिला आहे.

प्रशासकीय अधिकारी म्हणतात, मला
काहीच माहिती नाही
अचलपुरातील रस्त्यांच्या समस्येबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी स्विच आॅफ होता. प्रशासकीय अधिकारी मुश्ताक अली म्हणाले की, महाजन यांच्या तक्रारीबद्दल मला काहीच माहिती नाही. आपणाला माहिती हवी असल्यास बांधकाम विभागाशी संपर्क करण्याचा सल्ला त्यांनी दिला. याची संबंधितांकडून माहिती घेऊन नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असे ते म्हणाले.

मी एक महिन्यापूर्वी काँक्रीट रस्ता व नाला या दोघांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार केली. हे काम स्थानिक ठेकेदाराकडून केले. पण याची दखल न.प. ने घेतली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही लेखी तक्रारी केली आहे. याप्रकरणी न्यायालयात जाणार आहे.
- प्रफुल्ल महाजन, नगरसेवक.

महाजन यांनी निकृष्ट म्हटले म्हणून ते काम निकृष्ट झाले काय? नगरपरिषदेचे अभियंता रामावत व चव्हाण तेथे वेळोवेळी पाहणी करतात. त्यांचे त्या कामाकडे लक्ष आहे. शेवटची पाहणी माझ्याकडे असते. केंद्र सरकारकडूनही याची पाहणी होते. सदर रस्ता व नाल्याची कुणाकडूनही पाहणी करावी आणि कामाचा दर्जा ठरवावा. महाजन यांच्या तक्रारीत तथ्य नाही.
- निरंजन जोशी, नगर अभियंता न.प.

Web Title: Road condition in the Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.