महानगरपालिकेत वाहतुकीची कोंडी
By Admin | Updated: March 22, 2016 00:31 IST2016-03-22T00:31:26+5:302016-03-22T00:31:26+5:30
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संबंध असलेल्या महानगरपालिकेत रोज शेकडो अभ्यागतांचे जा-ये राहते

महानगरपालिकेत वाहतुकीची कोंडी
दोन सुरक्षा रक्षक तैनात : वाहने अस्ताव्यस्त, नागरिक होतात त्रस्त
मनीष कहाते अमरावती
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संबंध असलेल्या महानगरपालिकेत रोज शेकडो अभ्यागतांचे जा-ये राहते. एकर भरावच्या परिसरात वाहनांचे पार्किंग आहे. परंतु वाहनांच्या प्रमाणात पार्किंगची जागा अपुरी असल्याने दर मिनिटला वाहतुकीची कोंडी होते. येथे केवळ दोन सुरक्षा रक्षक तैनात आहेत.
सात लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेची स्थापना सन १९८३ साली झाली. उपनगरातील विविध कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे वाहन पार्किंगमध्ये उभे राहते. पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचेही वाहने येथे उभी केली जातात. पार्किंगची जागा तोकडी आहे. खुद्द महापौरांच्या वाहनाच्या अवतीभवती अनेक छोटी-मोठी वाहने पार्किंग केली जात आहेत. दोन सुरक्षा रक्षकांच्या जबाबदारीवर पार्किंग आहे. या दोन्ही सुरक्षा रक्षकांना दिवसभर वाहनधारकांना समजविण्यासाठी तत्पर रहावे लागते. प्रसंगी शाब्दिक चकमकही होते. हॅन्डल लॉक नसलेली वाहने इकडून तिडके सरकविण्याचे जिकरीचे कामही त्यांना करावे लागते. सकाळी १० वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात होते. तसेच बाहेरील वाहनेसुद्धा पार्किंगकरिता येथेच येत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची वाहने पार्किंगमधून बाहेर काढताना सुरक्षा रक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
अभ्यागतांना कामकाजानिमित्त येण्याकरिता वेळ ठरवून दिली तरच वाहतुकीची कोंडी सुटू शकते. याबाबत उपाययोजना सुरू आहे.
- चंदन पाटील,
उपआयुक्त, महानगरपालिका