२५ लक्षांचा रस्ता लाखात गुंडाळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 00:07 IST2016-07-10T00:07:37+5:302016-07-10T00:07:37+5:30

अचलपूर पंचायत समितीच्या मग्रारोहयोंतर्गत अंजनगाव रस्ते ते धोरखेडापर्यंत तयार करण्यात आलेल्या ...

The road of 25 lakhs was rolled out! | २५ लक्षांचा रस्ता लाखात गुंडाळला !

२५ लक्षांचा रस्ता लाखात गुंडाळला !

साटेलोटे : अचलपूर पंचायत समितीच्या मग्रारोहयोत प्रचंड भ्रष्टाचार
नरेंद्र जावरे परतवाडा
अचलपूर पंचायत समितीच्या मग्रारोहयोंतर्गत अंजनगाव रस्ते ते धोरखेडापर्यंत तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामात लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे चित्र असून अंदाजपत्रकाला तिलांजली देत काही लाखांतच गुंडाळून संबंधितांनी साटेलोटे करीत रस्ता वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत धोतरखेडा ग्रा.पं.तर्फे अंजनगाव रोड ते धोतरखेडापर्यंत पाणंद रस्त्याचे काम २०१४-१५ या आर्थिक वर्षातील मार्च महिन्याअखेरीस करण्यात आले. २३ लक्ष ४३,२५७ रुपयांचे एकूण अंदाजपत्रक आहे. जवळपास दोन किलोमीटर अंतराचा रस्ता मुरुम आणि माती टाकण्यासह २० ते २२ सिमेंट पाईप रस्त्याच्या मधात आडवे टाकण्याचे काम होते. प्रत्यक्षात १८५० मीटरच्या या पाणंद रस्त्याचे संबंधितांनी बारा वाजविल्याचे चित्र आहे. कामात प्रचंड अनियमितता करण्यात आल्याचा आरोप आहे. लाखो रुपये कागदोपत्रीच खर्च करण्यात आल्याचे प्रत्यक्ष चित्र आज आहे. मग्रारोहयोअंतर्गत मुरुम आणि माती टाकण्याचा कंत्राट संजय मेहरा यांना दिल्याचे सांगण्यात आले.

नियम धाब्यावर, मुरुम, माती बेपत्ता
अंजनगाव रस्ता ते धोतरखेडा गावापर्यंत तयार करण्यात आलेल्या या पाणंद रस्त्यावर मुरूम आणि माती अंदाजपत्रकाप्रमाणे न टाकता केवळ दिखावा करीत ढीग लावण्यात आले. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराने यात संगणमताने अपहार करीत सर्व नियम धाब्यावर बसविले. काही इंच माती आणि मुरुम टाकून रस्ता पूर्वीपेक्षा अतिशय खराब झाल्याचे पहिल्याच पावसात उघड झाले आहे.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
अंजनगाव रस्ता ते धोतरखेडा या पाणंद रस्त्यावर अवंत ग्रेट पब्लिक स्कूल आहे. हजारांवर विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शाळा प्रशासनाने स्वत:हून पूर्वी मुरुम, गिट्टी आणि दगड टाकून चांगल्या प्रकारचा रस्ता तयार केला होता. विद्यार्थी, पालकांना ये-जा करण्यासाठी तयार रस्त्यावर मग्रारोहयो अंतर्गत लाखों रुपये खर्चून पुन्हा काम करण्यात आले. पूर्वी पेक्षा चांगल्या दर्जाचा रस्ता होण्याची अपेक्षा असताना पूर्णत: विरुद्ध झाले. तशा आशयाची तक्रार शाळा प्रशासनाने एप्रिलमध्ये खंडविकास अधिकाऱ्यांना दिली. मात्र त्यानंतर अंदाजपत्रकाप्रमाणे काम करण्यात आले नाही.

२२ पाईप झाले बेपत्ता
पाणंद रस्त्यासाठी लाखो रुपये आले असताना त्यात मुरुम, माती व सिमेंट पाईप न टाकता कागदोपत्रीच योग्य दाखविले गेले. अचलपूर पंचायत समितीच्या मग्रारोहयोअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या कामासाठी तपासणी होणे गरजेचे ठरले आहे. संबंधित अधिकारी व कंत्राटदारांच्या संगणमताने अपहार झाल्याचे आता उघड होत आहे. यासंदर्भात खंडविकास अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र होऊ तो शकला नाही.

संबंधित पांदण रस्त्याच्या कामाची तक्रार प्राप्त झाल्यावर खंडविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे. मात्र अजूनपर्यंत अहवाल प्राप्त झालेला नाही.
- मनोज लोणारकर,
तहसीलदार, अचलपूर

Web Title: The road of 25 lakhs was rolled out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.