चमकोऱ्याचा व्याप अन् सर्पांचा वाढता ताप
By Admin | Updated: May 9, 2015 00:24 IST2015-05-09T00:24:17+5:302015-05-09T00:24:17+5:30
महापालिकेच्या हद्दीतील शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालटेकडी प्रभागातील सार्वजनिक नाल्यात

चमकोऱ्याचा व्याप अन् सर्पांचा वाढता ताप
अमरावती : महापालिकेच्या हद्दीतील शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालटेकडी प्रभागातील सार्वजनिक नाल्यात चमकोरा (अळू) चे रान माजले आहे. परिणामी सर्पांचा मुक्तसंचारदेखील वाढला असून परिसरातील नागरिकांसाठी ही समस्या डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे या नाल्याचे खोलीकरण, व स्वच्छता पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे आहे. पाठपुराव्यानंतरही याची दखल घेतली जात नसल्याची खंत परिसरातील नागरिक व्यक्त करतात. याशिवाय प्रभागात चार मागासवर्गीय लोकवस्त्या व इतर भागही मोडतो. साफसफाईसाठी पुरेशा मनुष्यबळाची गरज आहे. सोबतच अंतर्गत रस्त्यांची डागडुजी, पथदिवे, घरकूल योजना, रहिवाशांना घराचे कायमस्वरूपी पट्टे देण्याची नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.
शिवटेकडी उद्यानाचे पालटावे रूपडे
या प्रभागातील मालटेकडी (शिवटेकडी) येथे दररोज सकाळी व सायंकाळच्या सुमारास शहरातील आबालवृध्द येतात.लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी टेकडीच्या शेजारच्या परिसरात ठेवण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणी महापालिका प्रशासनाने हिरवळीचे रोपण करून लॉन तयार करावे, वृध्दांना बसण्यासाठी बेंचची सोयी-सुविधा उपल्बध करून दिल्यास या उद्यानाच्या सौंदर्यात नक्कीच भर पडू शकते. मात्र, यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने महापालिकेने उद्यानाच्या आकर्षणात भर टाकण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा मालटेकडीवर दररोज येणाऱ्या जागरूक आबालवृध्दांकडून व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक नळांची देखभाल गरजेची
शिवटेकडी प्रभाग क्रमांक १३ मध्ये मागासवर्गीय लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. परिसरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळ आहेत. मात्र, परिसरात वाढलेले गवत व सार्वजनिक नाली असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी खबरदारी घेण्याचे दृष्टीने हा परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. याकडे संबंधितांनी गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या कायमस्वरूपी दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सार्वजनिक शौचालय परिसर व्हावा नेटका
प्रभागातील जलप्रदाय कॉलनी येथे नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था केली आहे. मात्र, समोरच्या जागेत महापालिका प्रशासनाने काँक्रिटीकरण अथवा पेव्हिंग ब्लॉक बसवावे, जेणे करून पावसाळयात नागरिकांना चिखलातून येणे-जाणे करावे लागणार नाही. या दृष्टीकोनातून महापालिका व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्वच्छतेसाठी हवे पुरेसे मनुष्यबळ
महापालिकेच्या मालटेकडी प्रभागात मागासवर्गीय व इतर अशी संमिश्र लोकवस्ती आहे. प्रभागाचा विस्तारही बराच आहे. त्या तुलनेत साफसफाईसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरेसे नसल्याने नियमित तसेच समाधानकारक स्वच्छता करता येत नाही. वाढत्या लोकवस्तीचा विचार करता महापालिकेने दैनंदिन स्वच्छतेसाठी प्रभागात मनुष्यबळ वाढवावे, असा सूर उमटत आहे. त्याशिवाय प्रभागातील इतर समस्यांकडेदेखील गांभीर्याने लक्ष पुरविले जावे. असे प्रभागातील जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे. स्वच्छतेसाठी मनुष्यबळ वाढविल्यास परिसरातील घाण व केरकचऱ्याची समस्या मार्गी लागू शकते.
अशी आहे प्रभागाची रचना ही आहेत प्रभागाची वैशिष्ट्ये
मालटेकडी प्रभाग क्रमांक १३ मध्ये खापर्डे बगिचा, मांगीलाल प्लॉट, आदिवासी कॉलनी, आर्दश नेहरूनगर, परिगणित कॉलनी, पंचशील कॉलनी, जलसंपदा कॉलनी, कमिश्नर कॉलनी, पोलीस लाईन, आदिवासीनगर, मोहन कॉलनी, विद्याभारती महाविद्यालय परिसर, शास्त्री ले-आऊट, काझी कंपाऊड, विद्या कॉलनी, भाग्यश्री कॉलनी, मधुबन कॉलनी गुलमोहर कॉलनी, टोपेनगर, म्हाडा कॉलनी, पाऊसकर लेआऊड, मालटेकडी परिसर, राजमाता नगर, एसटी बसस्थानक परिसर, असा बराच भाग या प्रभागात समाविष्ट आहे.
प्रभागाच्या खास वैशिष्ट्यांमध्ये मुख्य म्हणजे शहराची ठळक ओळख असलेली मालटेकडी (शिवटेकडी) रेल्वे स्थानक परिसरातील गजानन महाराज मंदिर, कलेक्टर कॉलनीतील गणेश मंदिर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ, न्यायालय परिसर, जिल्हा परिषद, बीएसएनएल आॅफिस, बसस्थानक अशी या प्रभागातील खास वैशिष्ट्ये आहेत.