रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चातही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:41+5:302021-03-10T04:14:41+5:30

खताची सबसिडी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले होते. मात्र, असा कुठलाच प्रकार झालेला नाही. मात्र, ...

Rising prices of chemical fertilizers also increase the cost of production | रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चातही वाढ

रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चातही वाढ

खताची सबसिडी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले होते. मात्र, असा कुठलाच प्रकार झालेला नाही. मात्र, किमती दिवसेंदिवस वाढतच आहे. अद्याप बियाण्यांच्या किमतीबाबत प्रशासन बोलण्यास तयार नाही. त्यामध्येही काही प्रमाणात वाढ होणारच आहे. मजुरी वाढली, डिझेलची दरवाढ झाल्याने आता मशागतीचा खर्च वाढणार आहे. शेतीमध्ये अलीकडे यांत्रिकीकरणाचा शिरकाव झालेला आहे. बहुतेक कामे ट्रॅक्टरद्वारेच केली जातात. या सर्व प्रकारात शेतीचा खर्च वाढत असताना शेतमालाचे भाव मात्र वाढविले जात नसल्याने येत्या काळात शेती करायची तरी कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

ग्रामीण भागात अनेकदा खताची पोहोच कंपन्या देत नाहीत. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होत असल्यानेही स्थानिक दुकानदारांकडून वाढीव किमतीत शेतकऱ्यांना खत घ्यावे लागते. केवळ रासायनिकच नव्हे शेणखतांच्याही किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.

पॉईंटर

खताचे नाव जुने दर नवे दर

डीएपी १ - २५० १५००

१०:२६:२६ ११८५ १४००

१२:३२:१६ ११८५ १४१०

२०:२०:०:१३ १०१५ ११५०

बॉक्स

मशागत खर्चही वाढला

शेतीचा मशागत खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. पेट्रोल अन् डिझेल १०० रुपयांच्या आसपास पोहोचले. बीटीचे दर यंदा कायम राहतील, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात येते. अन्य बियाण्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतीचे यांत्रिकीकरण झाल्यानेे ट्रॅक्टरद्वारे मशागतीचा खर्चही वाढला आहे. शेतमजुरीचे दर आतापासूनच वाढायला सुरुवात झाल्यामुळे पेरणी, निंदण, खुरपण, सवंगणी, काढणी सर्व काही महागणार आहे.

कोट

शेतीमध्ये रासायनिक खते, बियाणे, मजुरी, डिझेलमध्ये वाढ झाल्यामुळे मशागत खर्चही वाढलेला आहे. त्याच्या तुलनेत शेतमालास भाव मिळत नाही, नाफेड केंद्रावर अटी-शर्तींचा भडीमार, बाजारात व्यापाऱ्यांद्वारे लूट यामुळे शेती करणे आता परवडेनासे झाले आहे.

धनराज कावरे, शेतकरी

कोट

केवळ रासायनिक खतांच्या नव्हे तर शेणखताची किंमतही तीन हजार रुपये प्रतिट्राॅली अशी झालेली आहे. आता पर्याय नसल्याने याचा वापर करावा लागत आहे. सोयाबीन बियाण्यांमध्ये उगवणशक्ती नसल्याने गतवर्षी वाढत्या किमतीत बियाणे खरेदी करावे लागले होते. यंदा ऐनवेळी धोका होऊ नये.

विनोद टेकाडे, शेतकरी

बॉक्स

खरिपाला लागणार २,८२,२९० मेट्रिक टन बियाणे

यंदाच्या खरीप हंगामाला २,८२,२९० मेट्रिक टन रासायनिक खतांचे नियोजन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. यामध्ये युरिया ५७ हजार २९२ मेट्रिक टन, डीएपी ४० हजार मेट्रिक टन, एमओपी २४ हजार ८१३ मेट्रिक टन, काॅम्प्लेक्स १ लाख १४ हजार ५०० मेट्रिक टन, एसएसपी ४५ हजार ६८५ मेट्रिक टन असे नियोजन आहे. एप्रिलमध्ये ४० हजार मेट्रिक टन, मे महिन्यात ४५ हजार ५०० मेट्रिक टन, जूनमध्ये ५४ हजार २९२ मेट्रिक टन, जुलैमध्ये ५२ हजार मेट्रिक टन, ऑगस्टमध्ये ४८ हजार २०० मेट्रिक टन व सप्टेंबर महिन्यात ४२ हजार २९८ मेट्रिक टन असे नियोजन आहे.

Web Title: Rising prices of chemical fertilizers also increase the cost of production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.