नागरिकांच्या जीवावर उठली पालिका
By Admin | Updated: June 30, 2016 00:25 IST2016-06-30T00:25:32+5:302016-06-30T00:25:32+5:30
जिल्ह्यात सर्वात मोठा परतवाडा येथील आठवडी बाजार समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.

नागरिकांच्या जीवावर उठली पालिका
सर्वत्र घाणीचे साम्राज्य : परतवाड्याचा आठवडी बाजार वाऱ्यावर, नागरिकांना मोफत मिळताहेत आजार
नरेंद्र जावरे परतवाडा
जिल्ह्यात सर्वात मोठा परतवाडा येथील आठवडी बाजार समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. नाल्या तुंबल्याने घाण पाणी रत्यावरील खड्ड्यांमध्ये साचले आहे. ठिकठिकाणी तलाव तयार झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी सुध्दा संबंधित नगरसेवक आाणि पालिका प्रशासन आंधळयाचे सोंग घेऊन गप्प असल्याचे संतापजनक चित्र आहे.
आठवडी बाजारात दररोज पालेभाज्या, फळांचा लिलाव पहाटे ५ वाजतापासून सुरु होतो. धारणी, चिखलदरा, अंजनगाव, चांदूरबाजार, अकोट, खंडवा, बैतूल, निजामाबाद, आदि परराज्यातून आलेल्या फळांचा लिलाव होतो. ट्रकमध्ये आालेला माला आणि खरेदी करुन चिल्लर विक्रीसाठी नेणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठया प्रमाणात गर्दी असते. तर दुसरीकडे परिसरातील किमान ८० खेड्यातून शेकडो नागरिक पालेभाज्यांसह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. असे असताना नगरपालिका प्रशासन मात्र पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
पालिकेत नवा गडी नवा राज
अचलपूर नगरपालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांचे चंद्रपूर येथे स्थानांतरण झाल्यावर त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. तर दुसरीकडे प्रदीप जगताप यांची नवीन मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. जगताप यांनी सोमवारी कामकाजाला सुरुवात केली आहे. जुळया शहरातील कोटयवधी रूपयांची थांबलेली विकासकामे आणि पावसाळयातील घाणीचे साम्राज्य यावर स्वच्छतेचा मंत्र देत कुठल्या पध्दतीने ते आपल्या कार्याला प्रारंभ करतात, यावर नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत.
बाजार समिती लक्ष देणार का ?
विदर्भात मोठ्या बाजार समिती मध्ये गणल्या जाणाऱ्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर मोठा आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या गप्पा मारणाऱ्या बाजार समितीने एक यार्ड पालेभाजी आणि फळविक्रेत्यांसाठी देवू नये, यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा कायदा शासन येत्या आठवड्यात पारित करित असताना त्याच शेतकऱ्यांना घाणीच्या साम्राज्यात आपल माल विकावा लागत आहे.
हा कुठला स्वच्छता संदेश
पावसाळयाची सुरुवात होताच ग्रामपंचायत, नगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, परिसरात स्वच्छता ठेवावी, ओला कचरा, सुका कचरा, कचरा कुंडी किंवा घंटागाडीत टाकण्यासह उघड्यावरील पदार्थ खाऊ नये, आदी सूचना दिल्या जातात. मात्र, पालिका प्रशासन सर्वसामान्य नागरिकांसाठी कशा पध्दतीने कार्य करते, हे ठिकठिकाणी पडून असलेले कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या आणि घाणीचे साम्राज्य यावरून दिसून येते.