रिद्धपूरवासीयांना मिळणार शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:28+5:302021-03-10T04:14:28+5:30
काम पूर्णत्वाला : विश्रोळी धरणातून थेट पाईप लाईन मोर्शी : महानुभावपंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील ...

रिद्धपूरवासीयांना मिळणार शुद्ध पाणी
काम पूर्णत्वाला : विश्रोळी धरणातून थेट पाईप लाईन
मोर्शी : महानुभावपंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. विश्रोळी धरणातून थेट रिद्धपूर गावापर्यंत पाईप लाईन टाकण्यात येऊन रिद्धपूर गावात उंच भागात पाण्याच्या टाकी निर्माण करण्यात आली. आता नुकतेच पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे काम पूर्णत्वास गेले, तर जलशुद्धीकरण प्लांटचे काम प्रगतिपथावर असल्याचे जीवन प्राधिकरणाचे अभियंता भावे यांनी सांगितले.
कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. रिद्धपूर गावातील महिला, पुरुषांना, शाळकरी विद्यार्थ्यांना कोसोदूर जाऊन पिण्याच्या पाण्यासाठी अहोरात्र पायपीट करावी लागत होती. दक्षता समितीचे अध्यक्ष प्रमोद हरणे यांनी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न तत्कालीन कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्याकडे मांडला. त्यांनी या योजनेसाठी ९ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर करून घेतला. त्यातून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. एप्रिल-मे मध्ये जल शुद्धीकरणाचे काम पूर्णत्वास जाऊन शुद्ध पाणीपुरवठा होणार असल्याने रिद्धपूरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा होऊन त्यांची तहान भागणार आहे. रिद्धपूर येथे ८ ते १५ दिवस नळ येत नव्हते. त्यामुळे रिद्धपूरवासीयांना पाण्याचे चटके सहन करावे लागत होते. आता मात्र पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी योजना अंमलात आल्याने रिद्धपूरवासीयांना व यात्रेकरूंना पाण्याची टंचाई भासणार नाही.