३२ अडत्यांचे परवाने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:01 IST2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:01:55+5:30
भाजीपाला यार्डात गर्दी कमी होण्यासाठी अडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २९ मार्च रोजी घेण्यात आली. यामध्ये सर्व अडत्यांनी यानंतर किरकोळ विक्री करणार नसल्याचे मान्य केले. परंतु, ४ एप्रिल रोजी पाहणी केली असता अडत्यांनी किरकोळ विक्री सुरूच ठेवल्याचे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले.

३२ अडत्यांचे परवाने रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने फळे व भाजीपाला विभागात गर्दी टाळण्यासाठी किरकोळ विक्री न करण्याचे आदेश अमरावती बाजार समितीचे सभापती व सचिवांनी दिले होते. या आदेशाला न जुमानता ३२ अडत्यांद्वारा किरकोळ विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे या अडत्यांचे परवाने शनिवारी रद्द करण्यात आले व त्यांना भाजीपाला यार्डमध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.
भाजीपाला यार्डात गर्दी कमी होण्यासाठी अडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २९ मार्च रोजी घेण्यात आली. यामध्ये सर्व अडत्यांनी यानंतर किरकोळ विक्री करणार नसल्याचे मान्य केले. परंतु, ४ एप्रिल रोजी पाहणी केली असता अडत्यांनी किरकोळ विक्री सुरूच ठेवल्याचे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले. शासनादेशाचे व बाजार समिती उपविधीचे उल्लंघन केल्याने या ३२ अडत्यांचे परवाने शनिवारपासून रद्द करण्यात येत असल्याचे आदेश बाजार समितीचे सभापती अशोक दहिकर व सचिव दीपक विजयकर यांनी काढले आहेत. या अडत्यांना भाजीपाला यार्डमध्ये विक्रीला मनाई करण्यात आली आहे. त्यांना यार्डातच प्रवेश निषेध करण्यात आले आहे. यानंतर यार्डात भाजीपाला विक्री केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे सचिव दीपक विजयकर यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला व 'सोशल डिस्टन्स' पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह पणन संचालक सुनील पवार यांनी सर्व बाजार समित्यांना दिले आहे. याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी पत्राद्वारे अमरावती बाजार समितीला याविषयी कळविले आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीद्वारा अडते असोसिएशनची बैठक घेऊन याविषयी सूचना केल्या होत्या. मात्र, सूचनेचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली.
या अडत्यांवर कारवाई
इंद्रपाल कालुराम वर्मा, प्रकाश रामदास शिरभाते, विजय अंबादास शिरभाते, अशोक रामदास उकंडे, मुस्ताक अहमद अ. रशीद, एस.के. सब्जी भंडार, अ. हबीब, जबी उल्हा शहा, अमरसिंग विजयसिंग ठाकूर, आसिफ महमहद इसुफ, शे. अनीस शे. हाफीज, शफी खाँ, श्रीराम बळीराम ढोले, एजाज अली विलायत अली, गणेश सिंग ठाकूर, बुधराम हरिराम चव्हाण, अर्थव चव्हाण, दिनेश कुलका चव्हाण, रोहित मधुकर देऊळकर, रवींद्र बनकर, गोकुळ रामकृपाल वर्मा, सुधाकर बाबाराव धानोरकर, रामगोपाल तिवारी, विलास शिरभाते, दीपक राखोंडे, अनंत टाके, अ. रफीक, अ, कादीर, अशलम शहदा अ. अजीज, अनिल चौकडे, राजाराम लंगडे, बिस्मिला शेख अमीर बिस्मिल्ला.