जि.प.चा विभागीय आयुक्तांकडून आढावा
By Admin | Updated: October 21, 2016 00:20 IST2016-10-21T00:20:25+5:302016-10-21T00:20:25+5:30
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचा विभागीय आयुक्तांनी बुधवारी दिवसभर विस्तृत आढावा घेतला.

जि.प.चा विभागीय आयुक्तांकडून आढावा
आढावा बैठक : विभागानिहाय तपासणी
अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचा विभागीय आयुक्तांनी बुधवारी दिवसभर विस्तृत आढावा घेतला. यावेळी काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच खातेप्रमुखांना दिल्यात. यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा, वसतिगृह आदी ठिकाणी सर्वच अधिकाऱ्यांनी सरप्राईज भेटी देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह, बीडीओंना दिल्यात.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनासह प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली. यावेळी विभागीय उपायुक्त आर.यू. अवचार, राजाराम झेंडे, सीईओ किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते. शिवाय आढावा बैठकीत जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छ भारत मिशन, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व अन्य घरकुलाच्या योजनांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. जि.प.तील खातेनिहाय चौकशी, निलंबन प्रकरणे, अनधिकृत र्गैरहजर कर्मचारी, सरप्र्राईज भेटी, अमृत आहार योजना, सेवा निवृत्तीचे प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे, निर्लेखित साहित्याचा लिलाव, शाळाबाह्य मुले, क्षतिग्रस्त वर्ग खोल्या, अनुकंपातील प्रकरणे, लोकप्रतिनिधीची प्रलंबित प्रकरणे, वृत्तपत्रात प्रकाशित होणाऱ्या बातम्यांची दखल घेऊन त्याचा खुलासा आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी जि.प.च्या अधिकाऱ्यांना दिल्यात. यावेळी विभागीय आयुक्तांनी विविध विभागांचा विस्तृत आढावा घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्यात. बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सर्वच विभागाचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)