संवेदनशील मतदान केंद्रांचा मुख्य निरीक्षकांकडून आढावा
By Admin | Updated: February 13, 2017 00:09 IST2017-02-13T00:09:05+5:302017-02-13T00:09:05+5:30
२१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्य निवडणूक निरिक्षक महेश पाठक यांनी शहरातील ५५ संवेदनशिल मतदान केंद्रांची पाहणी केली.

संवेदनशील मतदान केंद्रांचा मुख्य निरीक्षकांकडून आढावा
५५ केंद्रांची पाहणी : महापालिकेचे पथक सोबतीला
अमरावती : २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्य निवडणूक निरिक्षक महेश पाठक यांनी शहरातील ५५ संवेदनशिल मतदान केंद्रांची पाहणी केली.
पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, हमालपुरा झोनचे सहायक निवडणूक अधिकारी क्र. २ सुनील पकडे यांचेकडून पाठक यांनी मतदान केंद्राबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली. रविवारी सकाळी ९.४५ ते दुपारी १२ पर्यंत पाठक यांनी प्रभाग क्र. ८, १२, १५, १६, ४ आणि ५ अशा सहा प्रभागातील ५५ मतदान केंद्रांची पाहणी केली. प्रभाग क्र. ८ मधील मनपा मराठी प्राथमिक शाळा क्र. १३, उर्दू प्राथमिक शाळेतील प्रत्येकी सहा मतदान केंद्र, प्रभाग क्र. १२ मधील शिवाजी मराठा हायस्कूल आणि न्यू हायस्कूल बेलपुरामधील प्रत्येकी ४ मतदान केंद्र, प्रभाग क्र. १६ मधील असोसिएशन उर्दू बॉईज हायस्कूल मधील १० मतदान केंद्र, प्रभाग क्र. १५ मधील शासकीय अध्यापक विद्यालयातील सहा मतदान केंद्राची त्यांनी पाहणी केली.
याशिवाय प्रभाग क्र. ४ मधील मनपा उर्दू हायस्कूल शाळा क्र. ४ मधील ११ आणि अलइनाम एज्युकेशन वेलफेअर सोसायटी वाहेदखान कॉलेजमधील ४ आणि सरतेशेवटी प्रभाग क्र. ५ मधील सैफी ज्युबीली ज्युनिअर कॉलेजमधील ४ मतदान केंद्रांची मुख्य निवडणूक निरीक्षक महेश पाठक यांनी वस्तुनिष्ठ तपासणी केली तथा स्थानिक नागरिकांशी चर्चाही केली. या संवेदनशिल मतदान केंद्रांवर अधिकच्या सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले. संपर्क अधिकारी म्हणून महेश देशमुख यांनी ही प्रक्रिया चोखपणे बजाविली. (प्रतिनिधी)