‘त्या’ कारवाईविरुद्ध महसूल कर्मचारी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2017 00:09 IST2017-07-11T00:09:48+5:302017-07-11T00:09:48+5:30
शासकीय कर्तव्य बजावत असताना खोट्या फिर्यादीच्या आधारे धामणगाव येथील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यावर अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करणाऱ्या ...

‘त्या’ कारवाईविरुद्ध महसूल कर्मचारी एकवटले
कामबंद आंदोलन : कामकाज ठप्प, विभागात कामबंदचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासकीय कर्तव्य बजावत असताना खोट्या फिर्यादीच्या आधारे धामणगाव येथील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यावर अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करून गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. सोमवारी या मागणीसंदर्भात निवेदन देण्यासाठी सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
शुक्रवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महसुली कामकाज ठप्प झाले आहे. मागणी मान्य न झाल्यास अमरावती विभागात कामबंद आंदोलन करण्याचा ईशारा आंदोलनात सहभागी चारही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी रीतसर महसूलच्या अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच परस्पर गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले आहे. यापुढे कामे कशी करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याविरुद्ध तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना, विदर्भ पटवारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना व मंडळ अधिकारी संघटना एकवटल्या आहेत. या संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उगारून सात जुलैपासून महसुली कामकाज बंद केले आहे. तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र मालठाने, महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव गडलींग, महसूल अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेषराव लंगडे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष उगले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी उपस्थित होते.