१० कोटींचा महसूल पाण्यात

By Admin | Updated: March 4, 2017 00:16 IST2017-03-04T00:16:16+5:302017-03-04T00:16:16+5:30

जिल्ह्याला सर्वाधिक रेती लिलावातून महसूल देणाऱ्या धामणगाव तालुक्यातील सात रेती घाटांचा लिलाव अद्यापही झाला नाही़

Revenue of 10 crores in water | १० कोटींचा महसूल पाण्यात

१० कोटींचा महसूल पाण्यात

सात रेती घाटांचा लिलाव नाही : ४ हजार कुटुंबांवर उपासमारी, जबाबदारी स्वीकारणार कोण ?
मोहन राऊत धामणगाव रेल्वे
जिल्ह्याला सर्वाधिक रेती लिलावातून महसूल देणाऱ्या धामणगाव तालुक्यातील सात रेती घाटांचा लिलाव अद्यापही झाला नाही़ आगामी काळात हा लिलाव होण्याची शक्यता कमी असल्याने तब्बल १० कोटी रूपयांचा महसूल बुडणार आहे़ दरम्यान चार हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे़ या गंभीर बाबीची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल या तालुक्यातील बांधकाम व्यवसायकांनी उपस्थित केला आहे़
जिल्ह्यात महसूल विभागाने यंदा १३ तालुक्यांतील रेती घाटांचा लिलाव केला असला तरी आजपर्यंत सर्वाधिक किंमत असणाऱ्या धामणगाव तालुक्यातील रेती घाटाकडे सर्वच कंत्राटदारांनी यावर्षी पाठ फिरविली आहे़ यामागील संशोधनाची अनेक कारणे आहेत़
दहा कोटी रुपये पाण्यात : तालुक्यातील नायगाव येथील १० हजार ५१२ ब्रासची किमत १ कोटी ८३ लाख ९७ हजार, बोरगाव निस्ताने मधील ६ हजार ७८४ ब्रास रेतीची अपसेट प्राईज १ कोटी ३६ लाख ५२ हजार, सोनोरा काकडे येथील ६ हजार २१९ ब्रास ची किंमत १ कोटी ६८ लाख ४९ हजार, गोकुळसरा घाटातून १० हजार ६०१ ब्रास रेतीची किंमत २ कोटी ८४ लाख ४६ हजार, दिघी महल्ले येथील ६ हजार ३६० ब्रासची किंमत १ कोटी ७० लाख ६६ हजार, वकनाथ येथील १ हजार ६० ब्रास ची किंमत २ कोटी ८४ लाख ५ हजार अशी होती़
आष्टा येथील रेती घाटाचा पूर्वीच लिलाव झाला. शासकीय किमतीचा एक चतुर्थांश रक्कम लिलाव झाल्यानंतर भरणे गरजेचे होते़ या सात घाटांचा लिलाव तीन वेळा होऊनही कंत्राटदार पुढे न आल्याने शासनाचे १० कोटी रूपये पाण्यात गेल्यात जमा आहे़

विकासात्मक कामांमध्ये अडसर
धामणगाव तालुक्यातील सात घाटांच्या लिलावासाठी आजपर्यंत तीनवेशा ई निविदा बोलविण्यात आल्यात. मागील अनेक वर्षांपासून या भागाचे रेती घाट घेणारे कंत्राटदार फिरकले नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे या मागचे अधिक किंमत ठेवण्यात आल्यामुळे कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे़ जिल्ह्यात बांधकाम व्यवसायात धामणगाव तालुका अग्रेसर आहे़ येथील रेती उत्खनन व बांधकामावर मजुरी करणारे अनेक कुटुंब आहेत़ मागील तीन महिन्यापासून रेतीचा लिलाव न झाल्यामुळे बांधकाम पूर्णत: ठप्प आहेत़ या तालुक्यातील मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे़ विकासात्मक कामे या रेतीमुळे बंद झाले आहे़ आगामी काळात या रेतीचे घाट लिलाव होणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे़

रेती घाट लिलावधारकांना सुरक्षा नाही
मागील अनेक वर्षांपासून या भागातील रेती घाटाचा लिलाव किंमत अधिक असली तरी घेण्यास हरकत नव्हती. आम्ही या रेतीघाटाचे लिलाव आजपर्यंत घेतले. परंतु गतवर्षी कोट्यवधी रूपयांत घाट घेऊनही आमची कैफियत कोणीच ऐकून घेतली नाही़ एका तक्रारदाराने तक्रार केल्यावर थेट फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागले एकीकडे शासनाला कोट्यावधी रूपयांच्या महसुलाचा मोबदला आम्ही द्यावा, तर दुसरीकडे कोणतीच सुरक्षा प्रशासनाकडून मिळत नाही़ त्यामुळे रेती घाटाचा लिलाव घ्यायचा तरी कसा, असा सवाल मागील वर्षी रेती घाट लिलाव घेणाऱ्या कंत्राटदाराने निर्माण केला आहे़

जबाबदारी कुणाची? ग्रामस्थांचा सवाल
धामणगाव तालुक्याचे अर्थकारण रेतीवर आहे़ दरवर्षी या भागात सर्वाधिक बांधकाम होते. मात्र यंदा रेतीघाट लिलाव न झाल्याने रेतीची मागणी वाढली आहे़ चांदूररेल्वेचे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी या भागात एक दिवसाआड दौरा करून रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या़ रेती घाटात प्रवेशबंदी केली. तहसीलदार चंद्रभान कोहरे यांनीही अवैध रेती तस्काराविरूद्ध बंड पुकारून कारवाईचा बडगा उगारला़ वर्धा जिल्ह्यातील दुसऱ्या भागातील वडगाव पांडे येथील रेतीघाटाचा लिलाव झाला. तेथून रेतीचे उत्खन्न सुरू आहे़ धामणगाव तालुक्याच्या हद्दीतील रेती उपसा केल्याच्या तक्रारी आहेत. त्यासंदर्भात तालुका प्रशासन कारवाई करीत आहे़ या गंभीर बाबीची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे़

कोणीही या कामात हयगय केली असल्याचे उघड झाल्यास थेट निलंबनाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे़ फिरत्या पथकाकडून रेती तस्करांना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव चौकशीत स्पष्ट झाल्यास थेट संबंधित कर्मचाऱ्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल़
- चंद्रभान कोहरे, तहसीलदार, धामणगाव रेल्वे

Web Title: Revenue of 10 crores in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.