परतवाडा, चांदूरबाजारचे एसटी डेपो टाकणार कात
By Admin | Updated: June 24, 2016 23:58 IST2016-06-24T23:58:19+5:302016-06-24T23:58:19+5:30
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या परतवाडा आणि चांदूरबाजार बस आगाराचा कायापालट होणार आहे.

परतवाडा, चांदूरबाजारचे एसटी डेपो टाकणार कात
विकासाची नांदी : बच्चू कडूंनी केली पाहणी
परतवाडा : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या परतवाडा आणि चांदूरबाजार बस आगाराचा कायापालट होणार आहे. आ.बच्चू कडू यांच्या विशेष प्रयत्नातून यासाठी अडीच कोटी रूपये मंजूर झाले आहेत. गुरूवारी त्यांनी अधिकाऱ्यांसह बसस्थानकाची पाहणी केली.
या आगारात छोटे उद्यान, प्रवाशांना बसायला जागा, खरेदीसाठी मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पार्किंग झोन तयार करण्यात येईल. गुरुवारी जवळपास दोन तास त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. याआधी या दोन्ही आगारांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. आता हा संपूर्ण परिसर हा स्वच्छ झाला आहे. आ. बच्चू कडू यांनी या आगारांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केलेत. त्या अनुशंगाने यासाठी तब्बल २.५० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. आगाराच्या आधुनिकीकरणाचे कामे लवकरच सुरु होईल. जुन्या इमारतीचे नूतनीकरण, गाड्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल, सुटसुटीत व प्रवाशांच्यादृष्टीने आखणी करण्यात आली असून आगारात एका वेळी १० गाड्या उपलब्ध राहणार आहेत.
आगाराचे परिसरात उद्यानाचे बांधकाम करण्यात येणार आहे. याबैठकीमध्ये विभाग नियंत्रक राजेश अडोकार, रा.प. मंडळाचे स्थापत्य अभियंता खोडेकर, रामटेके, परतवाडयाचे आगारप्रमुख अनंत ताटर व वाहतूक निरीक्षक मिथून शर्मा यांचेसह प्रहार पक्षाचे पदाधिकारी तथा न.प.चे माजी बांधकाम सभापती बल्लू जवंजाळ, उपजिल्हा प्रमुख प्रशांत आवारे आदी उपस्थित होते.