परतवाडा सील, चार जण क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:42+5:30
कांडली ते कविठा मार्ग बंद करण्यात आला आहे. या पोलीस शिपायाचे वास्तव्य कांडलीतील फ्रेंड्स कॉलनीत असल्यामुळे ज्या क्षेत्रात घर आहे तो एक किलोमीटरचा परिसर स्थानिक प्रशासनाने सील केला आहे. बाजूचा अडीच किलोमीटरचा परिसर बफर झोन जाहीर केला आहे.

परतवाडा सील, चार जण क्वारंटाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : स्थानिक पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील चौघांना क्वारंटाईन केले आहे. कांडली ते कविठा मार्ग बंद करण्यात आला आहे. या पोलीस शिपायाचे वास्तव्य कांडलीतील फ्रेंड्स कॉलनीत असल्यामुळे ज्या क्षेत्रात घर आहे तो एक किलोमीटरचा परिसर स्थानिक प्रशासनाने सील केला आहे. बाजूचा अडीच किलोमीटरचा परिसर बफर झोन जाहीर केला आहे.
दरम्यान, शिपायाच्या कुटुंबातील चौघांना थ्रोट स्वॅब देण्याकरिता गुरुवारला सकाळी अमरावतीला पाठविण्यात आले आहे. यात पत्नी, मुलगा, मुलगी व आईचा समावेश आहे. या शिपायाला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवला. त्यामुळे २५ एप्रिल ते १ मे पर्यंत कांडलीतीलच एका डॉक्टरकडे त्यांनी औषधोपचार सुरू केला. यातच ताप उतरत नाही म्हणून १ मे रोजी परतवाड्यातील खासगी दवाखाण्यात दाखल झालेत. तेथे १ ते ३ मे पर्यंत सलाईनसह औषधोपचार करण्यात आले. या दरम्यान दवाखाना ते घर असा त्यांचा प्रवासही राहिला. अखेर ३ मे रोजी त्या खासगी दवाखान्यातून त्याला स्थानिक प्रशासनाने अमरावतीच्या सरकारी दवाखान्यात पाठविले. तेथे थ्रोट स्वॅब घेतला गेला. थ्रोट स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला. येथून ते अमरावतीमधील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. या खासगी रुग्णालयाने परत थ्रोट स्वॅब घेऊन नागपूरला प्रायव्हेट लॅबकडे पाठविले. हा अहवाल बुधवारला पॉझिटिव्ह आला. या पॉझिटिव्ह अहवालानंतर स्थानिक प्रशासन सतर्क झाले. अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे, परतवाड्याचे ठाणेदार सदानंद मानकर, तालुका आरोग्य अधिकारी किरण शिंदे यांच्यासह पोलीस, आरोग्य व पंचायत विभागाचे अधिकारी, कर्मचारी पथकांसह गुरुवारी सकाळी कांडलीतील फ्रेंड्स कॉलनीत दाखल झाले. त्यांनी परिसर सील केला.
निर्जंतूकीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कांडली ते कविठा मार्ग बंद करण्यात आला. परतवाड्यातील एका खासगी डॉक्टरसह कांडलीतील एका डॉक्टरला थ्रोट स्वॅब देण्याचे निर्देश दिले आहेत. दवाखाना बंद ठेवून १४ दिवस क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देत संपूर्ण दवाखाना सॅनिटाईझ करण्यास सांगितले आहे.
पोलीस ठाणे सॅनिटाईझ
या पोलीस शिपायाला परत अमरावतीला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याचा परत थ्रोट स्वॅब घेतला जाणार आहे. या पोलीस शिपायाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे सुरू आहे. परतवाडा पोलीस ठाण्याला पूर्णपणे सॅनिटाईझ करण्यात आले आहे. मागील १४ दिवसांत हा पोलीस शिपायी पोलीस ठाण्यातील कुठल्याही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेला नाही.
फ्रेंन्डस कॉलनीतील एक किलोमीटरचा परिसर सील केला आहे. कांडली- कविठा मार्ग बंद केला. त्या पोलीस शिपायाच्या कुटुंबातील चौघांना थ्रोट स्वॅब देण्याकरिता अमरावतीला पाठविले. त्यांच्या संपर्कात आलेल्या संभाव्य लोकांचा शोध घेणे सुरू आहे.
-मदन जाधव, तहसीलदार
ज्या खासगी डॉक्टरांकडे पोलीस शिपायाने उपचार घेतले आहेत, त्यांना थ्रोट स्वॅब देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दवाखाना बंद ठेवून होम क्वारंटाईनच्या सूचनादेखील दिल्या आहेत.
- डॉ.सरवत वर्मा,
अधीक्षिका, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर