दिवाळीनंतर परतीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:01:07+5:30
दिवाळीत घर गाठण्यासाठी अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळविले. वेळेवर ज्यांना दिवाळीत घर गाठायचे होते, अशांनी रेल्वे दलालांकडून चढ्या दरात तिकीट मिळविले. घर गाठण्याची कशीतरी व्यवस्था झाली. दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आता अनेकांना परत जाण्याचे वेध लागले आहेत.

दिवाळीनंतर परतीचे वेध
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बाहेरगावी नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि रोजगारासाठी असलेल्यांनी कसेबसे दिवाळीत घर गाठले. मात्र, दिवाळी आप्तस्वकीयांसह साजरी केल्यानंतर आता परतीचे वेध लागले आहेत. तथापि, परतीचा प्रवास कसा करावा, हा गंभीर प्रश्न अनेकांपुढे निर्माण झालेला आहे. रेल्वे गाड्यांमध्ये चिक्कार गर्दी, तर ट्रॅव्हल्स संचालक अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्यामुळे परतीच्या प्रवासाचे नियोजन कोलमडण्याचे संकेत आहेत.
दिवाळीत घर गाठण्यासाठी अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळविले. वेळेवर ज्यांना दिवाळीत घर गाठायचे होते, अशांनी रेल्वे दलालांकडून चढ्या दरात तिकीट मिळविले. घर गाठण्याची कशीतरी व्यवस्था झाली. दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आता अनेकांना परत जाण्याचे वेध लागले आहेत. मात्र, रेल्वे गाड्यांमध्ये नोव्हेंबरपर्यंत ‘नो रूम’ असे आरक्षण खिडक्यांवर झळकत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदाबाद, सुरत, दिल्ली, चेन्नै आदी मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळेनासे झाले आहे. विशेषत: ट्रॅव्हल्स संचालकांनी अमरावतीवरून नाशिक, पुणे, औरंगाबादचे प्रवास भाडे दुप्पट, तिप्पट आकारण्याची शक्कल लढविली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नाही, तर ट्रॅव्हल्सचे अव्वाच्या सव्वा दर असल्याने दिवाळीत कुटुंबीयांसह घरी आलेल्यांना परत कसे जावे, हाच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अमरावती-मुंबई, नागपूर-पुणे गरीब रथ, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, हावडा-पुणे सुपर डिलक्स, भुसावळ-निझामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस आदी महत्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये चिक्कार गर्दी आहे. दिवाळीतील गर्दी हेरून काही रेल्वे तिकीट दलालांनी जादा आरक्षण करून ठेवले आहे. आता रेल्वे गाड्यांच्या आरक्षणासाठी तिप्पट दर घेण्यात येत आहे तसेच बुधवारपासून नोकरदारांना कार्यालय गाठावे लागत असल्याने मंगळवारी प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे चढ्या दरात तिकीट घेत प्रवासाचे नियोजन करण्याला काही जणांनी पसंती दिली आहे.
रेल्वे तिकीट दलालांची ‘बल्ले बल्ले’
मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर असे तीन महिने रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळणार नाही, अशी स्थिती आहे. रेल्वे तिकीट दलालांनी पुणे, मुंबई प्रवासाचे आरक्षण अगोदरच बूक केले आहे. आता रेल्वेत आरक्षण नाही. त्यामुळे नाइलाजास्तव दिवाळीत घरी आलेल्यांना दलालांकडून अतिरिक्त दरात रेल्वे आरक्षणाचे तिकीट घेऊन सोय करावी लागत आहे. दिवाळीनंतर खºया अर्थाने रेल्वे तिकीट दलालांची ‘बल्ले बल्ले’ असल्याचे चित्र आहे.