सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या प्रलंबित
By Admin | Updated: June 14, 2014 23:04 IST2014-06-14T23:04:11+5:302014-06-14T23:04:11+5:30
नांदगाव (खंडेश्वर) पंचायत समितीमधील सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याच्या दृष्टीने संबंधीत अधिकारी व कर्मचारी कमालीचे उदासीन आहे. त्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ उपोषणाच्या

सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या प्रलंबित
नांदगाव खंडेश्वर : नांदगाव (खंडेश्वर) पंचायत समितीमधील सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याच्या दृष्टीने संबंधीत अधिकारी व कर्मचारी कमालीचे उदासीन आहे. त्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ उपोषणाच्या पावित्र्यात आहे. निवड श्रेणीचे २५ टक्के सुध्दा काम झाले नसून याबाबत संघटनेचे पदाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना भेटावयास गेले असता अडचणी सांगून टाळाटाळ करतात.
अनेक शिक्षकांची सेवा पुस्तके दिसत नसल्याची सबब सांगून त्याचा शोध न घेता काम ठप्प आहे. तसेच अमरावती जिल्हा परिषद यांनी निवड श्रेणी करिता सेवानिवृत्त शिक्षकांच्या सुटलेल्या नावाची यादी मागविली. पण येथे अजूनही ती यादीच तयार झालेली नाही.
दर महिन्याला पहिल्या मंगळवारी पंचायत समिती स्तरावर पेंशन अदालत होणे अपेक्षित आहे. पण अनेक महिन्यांपासून पेंशन अदालत नाही. यासाठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे पदाधिकारी जातात. पण कधीच पूर्ण अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात. गटशिक्षणाधिकारी ही सभेला हजर नसतात.
पंचायत समिती मधून ४ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे गट विम्याचे प्रस्ताव अजूनपर्यंत मंजुरातीकरिता जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले नाही. दर महिन्याच्या पेंशन धारकाच्या चेककरिता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पंचायत समिती कार्यालयात ठिया द्यावा लागतो. मे २०१४ च्या पेंशनची डिमांडच केली नसल्याचे सांगण्यात आले. सेवानिवृत्तीच्या अशा अनेक समस्या रेंगाळत असल्याने अखेर शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाला बसण्याची तयारी दर्शविली आहे.
याबाबत चर्चा करतेवेळी तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष एस.बी. मरपाळ, सरचिटणीस एच.एस. कानेटकर, अमरावती जिल्हा संघाचे अध्यक्ष बी.आर. गुंड तसेच बडगे, गणवीर, कारमोरे, कणसे, वानखडे, पारेकर, ठाकरे, गावंडे, महाजन, मारोटकर, गेडाम, म्हात्रे, सव्वालाखे, चोपकर, धोटे यांच्यासह अनेक सेवानिवृत्त शिक्षकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)