सेवानिवृत्त जेलरच्या हत्या प्रकरणातील आरोपी निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:48+5:30
विधीनुसार, सेवानिवृत्त जेलर मित्रा हे फ्रेजरपुरा हद्दीतील एका महिलेच्या घरात भाड्याने राहत होते. १० जुलै २०१४ रोजी मित्रा घरात असल्याचे महिलेने पाहिले होते. मात्र, त्यानंतर त्यांची चाहुल लागली नाही. दोन दिवसांनंतर मित्रा यांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी १४ जुलै २०१७ रोजी फ्रेजरपुरा पोलीसात तक्रार नोंदविली.

सेवानिवृत्त जेलरच्या हत्या प्रकरणातील आरोपी निर्दोष
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सेवानिवृत्त कारागृह अधीक्षक पी.एन.के मित्रा यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक २ यांच्या न्यायालयाने ९ आॅक्टोबर रोजी हा निर्णय दिला. याप्रकरणात बचाव पक्षांकडून अॅड. परवेज खान यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
विधीनुसार, सेवानिवृत्त जेलर मित्रा हे फ्रेजरपुरा हद्दीतील एका महिलेच्या घरात भाड्याने राहत होते. १० जुलै २०१४ रोजी मित्रा घरात असल्याचे महिलेने पाहिले होते. मात्र, त्यानंतर त्यांची चाहुल लागली नाही. दोन दिवसांनंतर मित्रा यांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी १४ जुलै २०१७ रोजी फ्रेजरपुरा पोलीसात तक्रार नोंदविली. या माहितीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मित्रा यांच्या खोलीचे कुलुप तोडून आत प्रवेश केला असता, मित्रा यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत साखळदांडात जखडलेला व त्याला कुलूप लावलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणात पोलिसांनी गुप्त माहितीवरून आरोपी सैय्यद सैफ अली अफसर अली याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर सैय्यद सैफ अलीविरुध्द भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन लूट करण्याच्या उद्देशाने सेवानिवृत्त जेलरची हत्या केल्याचे बयाण दिले. पोलिसांनी आरोपीच्या घरातून कपडे तसेच चाव्या जप्त केल्या. सतीश सोळंके याच्या माध्यमातून जेलर मित्रा यांच्या सोन्याच्या अंगुठ्या विक्री केल्याचे आरोपीने बयाणात म्हटले होते. त्याने ज्या दुकानात अंगठ्या विक्री केल्या होत्या. त्या दुकानादाराचे बयाण पोलिसांकडून नोंदविण्यात आले. आरोपीने घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला, आरोपीकडून जप्त केलेल्या चाव्यापैकी दोन चाव्या जेलर मित्रा याच्या घरातील कुलुपांना लागल्याचा उल्लेख पोलिसांनी आरोपपत्रात केला. मात्र, पोलिसांनी पंचनाम्यादरम्यान ज्या चाव्या दाखविल्या, त्यावर कंपनीच्या नावाचा उल्लेख नाही. पोलिसांनी कुलुप तोडून आत प्रवेश केला, तर पंचनाम्यात कडी उघडून घराच्या आत प्रवेश केल्याचे म्हटले आहे.
या तफावतीवर बचाव पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपपत्र आणि पंचनाम्यातील घटनाक्रमांमध्ये विसंगती असल्याची बाब अॅड. परवेज खान यांनी न्यायालयासमोर मांडली. सरकारी पक्षातर्फे न्यायालयात १२ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.