निर्बंध शिथिल; जिल्हा ‘अनलॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:16+5:302021-08-15T04:16:16+5:30
पंचसूत्रीचे पालन करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या संचारबंदीत शिथिलता आणत जिल्ह्यातील आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, शॉपिंग ...

निर्बंध शिथिल; जिल्हा ‘अनलॉक’
पंचसूत्रीचे पालन करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या संचारबंदीत शिथिलता आणत जिल्ह्यातील आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, शॉपिंग मॉल, अत्यावश्यक, जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक आदी सर्व प्रकारची दुकाने आठवड्याचे सातही दिवस रात्री १० पर्यंत खुले ठेवण्यास मुभा दिली आहे. तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी शनिवारी जारी केला.
आदेशानुसार, दुकानात काम करणाऱ्या सर्वांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. दुसरी मात्रा झाल्यावर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. सर्व उपाहारगृहे, बार, हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंत खुले असतील. तथापि शेवटची प्रत्यक्ष ऑर्डर ९ वाजेपर्यंतच घेता येणार असून, पार्सल सुविधा २४ तास सुरू राहील. कामगारांचे लसीकरण, शारीरिक अंतर, मास्क, स्वच्छता आदी बाबी बंधनकारक असतील.
बॉक्स
परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना ७२ तासांपूर्वीचे आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहील. निसर्ग पर्यटन व जंगल सफारी अंतर्गत कोर व बफर क्षेत्रातील सफारी सुरू ठेवण्यास मुभा आहे.
बाॅक्स
हॉटेल, रेस्टॉरंट, बारसाठी ५० टक्के क्षमता
सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स आठवड्यातील सातही दिवस रात्री १० पर्यंत सुरू ठेवता येईल. सोबतच हॉटेल रेस्टॉरेंट ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.
बॉक्स
हे राहणार सुरू
खासगी कार्यालये आस्थापना २४ तास सुरू ठेवता येणार
बॅडमिटन, टेबल टेनिस आदी इनडोअर खेळांना परवानगी
जिम्नॅशियम, योगसेंटर, सलून आणि स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, मैदाने, उद्याने स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील. विवाह सोहळ्यांसाठी बंदिस्त सभागृहात आसनक्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती (जास्तीत जास्त १०० व्यक्ती), तर खुले प्रांगण किंवा लॉनमध्ये जास्तीत जास्त २०० व्यक्तींना मुभा आहे.
बॉक्स
यांना परवानगी नाही
चित्रपटगृहे, बहुविध चित्रपटगृहे, धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली आदी पुढील आदेशापर्यंत बंद आहेत.
कोट
बाजारपेठ खुली करण्यात आली आहे. मात्र, दक्षतेचा विसर पडू नये. कोविडची तिसरी लाट रोखण्यासाठी मास्कचा वापर, शारीरिक अंतर, सॅनिटायझर, लसीकरण, टेस्टिंग व आयसोलेशन या पंचसूत्रीचा वापर करावा.
- यशाेमती ठाकूर, पालकमंत्री