फटाक्यांवर निर्बंध
By Admin | Updated: October 23, 2016 00:27 IST2016-10-23T00:27:35+5:302016-10-23T00:27:35+5:30
दिवाळीच्या कालावधीत फटाके फोडण्यावर शहर पोलिसांनी निर्बंध घातले आहे. २८ आॅक्टोबरपासून दिवाळी कालावधीत सार्वजनिक रस्त्यांवर

फटाक्यांवर निर्बंध
पोलीस आयुक्तांचे निर्देश : महापालिकेशी समन्वय
अमरावती : दिवाळीच्या कालावधीत फटाके फोडण्यावर शहर पोलिसांनी निर्बंध घातले आहे. २८ आॅक्टोबरपासून दिवाळी कालावधीत सार्वजनिक रस्त्यांवर तसेच वाहतुकीस अडथडा निर्माण होईल, अशा पद्धतीने फटाके फोडण्यास, शोभेचे दारूकाम करण्यास कुठल्याही धर्मातील देवी-देवतांचे चित्रे असलेले फटाके फोडण्यास मनाई केली आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
राज्याच्या गृह विभागाने २० आॅक्टोबरला फटाक्याच्या उपयोगासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून उच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी संयुक्त बैठक घेतली. बैठकीला शहरातील फटाका विक्रेतेही उपस्थित होते. दीपावलीच्या वेळी व्यावसायिकांना स्वत:च्या घरामध्ये, दुकानामध्ये व इतर ठिकाणी जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फटाका विक्रीस फटाका साठवणुकीस बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजारपेठेत, रस्त्यालगतच्या दुकानांत, हातगाडीवर व अन्य इतर सार्वजनिक ठिकाणी साठा करण्यास व विक्री करण्यासंदर्भात सीआरपीसीच्या १४४ कायद्यान्वये बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी लक्षात घेऊन फटाका व्यवसाय करणाऱ्यांनी योग्य ते निर्णय घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्यात. निश्चित केलेल्या ठिकाणी व्यवसाय करण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान नेहरू मैदानात फटाक्यांची बाजारपेठ सजते, मात्र, यंदा वर्दळीच्या बाजारपेठेत फटाके विक्रीस बंदी घालण्यात आल्याने यंदा नेहरू मैदानात फटाका विक्रीस परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे फटाके व्यावसायिकांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. यंदा फटाक्यांचे प्रतिष्ठाने दसरा किंवा सायस्कोर मैदानात लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, व्यवसायिक नेहरू मैदानातील जागेवरच फटाका विक्रीस परवानगी द्यावी, अशी भुमिका अमरावती चिल्लर फटाका विक्रेता संघाने घेतली आहे.
दरवर्षी नेहरू मैदानात फटाका विक्रीचे मोठी बाजारपेठ भरते. जिल्ह्याभरातून नागरिक त्याठिकाणी फटाका खरेदीकरिता येतात.