शहर सुरक्षेची जबाबदारी आपणा सर्वांचीच!
By Admin | Updated: August 27, 2014 23:12 IST2014-08-27T23:12:25+5:302014-08-27T23:12:25+5:30
नागरिकांनी सतर्कता बाळगून स्वत:ची जबाबदारी कशी पार पाडावी हा महत्त्वपूर्ण संदेश मिशन जागृती या कार्यक्रमातून पोहचतो आहे. सामान्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेले हे मार्केटिंग लोकोपयोगी आहे,

शहर सुरक्षेची जबाबदारी आपणा सर्वांचीच!
पोलिसांचा उपक्रम : 'मिशन जागृती' अभियानाद्वारे शहरभरात जनजागृती
अमरावती : नागरिकांनी सतर्कता बाळगून स्वत:ची जबाबदारी कशी पार पाडावी हा महत्त्वपूर्ण संदेश मिशन जागृती या कार्यक्रमातून पोहचतो आहे. सामान्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेले हे मार्केटिंग लोकोपयोगी आहे, असे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी केले.
शहर पोलीस आयुक्तालयाकडून सांस्कृतिक भवनात बुधवारी 'मिशन जागृती' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त सुरेश मेकला, जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी प्रस्ताविक केले. ते म्हणाले की, सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क होणे ही काळाची गरज आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मिशन जागृती हा उपक्रम महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी शहरातील ३४ महाविद्यालयांना भेटी दिल्यात. विद्यार्थांना वाहतूक नियम, सायबर क्राईम व दहशतवादी हल्ले थांबविण्याच्या उद्देशाने काय उपाययोजना कराव्यात, याचे धडे दिले. जबाबदारी लक्षात घेऊन जर नागरिकांनी स्वत:चे कर्तव्य पार पाडले तर नक्कीच एक चांगले शहर निर्माण होऊ शकते.
धावत्या गाडीत मोबाईलवर बोलताना अपघात कसे घडू शकतात, तोतया पोलीस महिलांना कसे लूटतात, चेन स्नॅचिंग कशी होते, एखाद्या ठिकाणी बॉम्ब कसा लपविला जातो, बेवारस वस्तू आढळल्यास कशी सतर्कता बाळगावी याबाबतची प्रात्यक्षिके एलसीडी प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थांना दाखविण्यात आलीत. मिशन जागृती अभियानामध्ये अनेकांनी सहभागी होण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नितीन थोरात व आभार प्रदर्शन पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी केले.
यावेळी उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)