वसतिगृहात गणपती स्थापनेवरून वाद
By Admin | Updated: September 19, 2015 00:23 IST2015-09-19T00:23:27+5:302015-09-19T00:23:27+5:30
बडनेरा एमआयडीसी परिसरातील निभोंरा येथील मुलांच्या वसतीगृहात गणपती स्थापनेवरून झालेला वाद शुक्रवारी दुपारी सामाजिक न्याय भवनात पोहोचला.

वसतिगृहात गणपती स्थापनेवरून वाद
हिंदू संघटना सरसावल्या : सामाजिक न्याय भवनात विद्यार्थ्यांचा ठिय्या
अमरावती : बडनेरा एमआयडीसी परिसरातील निभोंरा येथील मुलांच्या वसतीगृहात गणपती स्थापनेवरून झालेला वाद शुक्रवारी दुपारी सामाजिक न्याय भवनात पोहोचला. विद्यार्थ्यांकडून हिन्दू संघटनानी पुढाकार घेऊन समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त डी.डी. फिस्के यांना जाब विचारल्याने एकच गोंधळ उडाला.
शासकीय वसतीगृह परिसरात सार्वजनिक उत्सवाला परवानगी नसतानाही काही विद्यार्थ्यांनी गणपती प्रतिष्ठापना केली. काही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविल्याने वादाला सुरुवात झाली. त्याबाबत काही विद्यार्थ्यांनी समाजकल्याण सहआयुक्त डी.डी. फिस्के यांच्या दालनात ठिय्या मांडला. तेथे हिन्दुत्ववादी सघंटनेचे विनोद शर्मा, राहुल माटोडे, निरंजन दुबे, नीलेश सावळे, प्रतीक दुधाने, अभिजित सवई समाजकल्याण सहआयुक्तांच्या दालनात पोहोचले. त्यांनीही विद्यार्थ्यांची बाजू मांडली. मात्र, शासकीय वसतिगृहात सार्वजनिक उत्सवांना परवानगी नसल्याचे सहआयुक्त फिस्के यांनी सांगितले. सहआयुक्तांच्या दालनात विद्यार्थ्यांच्या गोंधळ होत असल्याची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक डी.सी. खंडेराव यांच्या नेतृत्वात पीएसआय इंगळे यांनी मध्यस्ती करून वाद निवळण्याचा प्रयत्न केला. अखेर सहआयुक्तांनी वसतिगृहात अधिकाऱ्यांना चौकशीकरिता पाठविले होते.
शासकीय परिसरात सार्वजनिक उत्सवांना परवानगी नाही. तरीही काही विद्यार्थ्यांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली. त्याला काही विद्यार्थ्यांनी विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांना वैयक्तीकरीत्या गणपतीची स्थापना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत काही संघटनांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले.
- डी.डी. फिस्के, सहआयुक्त, समाजकल्याण विभाग.