जमीन मोजणीस विरोध, शेतकऱ्यांनाच डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2017 00:02 IST2017-01-23T00:02:53+5:302017-01-23T00:02:53+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यास आलेल्या ...

Resistance to counting the land, farmers protested | जमीन मोजणीस विरोध, शेतकऱ्यांनाच डांबले

जमीन मोजणीस विरोध, शेतकऱ्यांनाच डांबले

मंगरूळमध्ये तणाव : पोलिसांवर दडपशाहीचा आरोप, जगतापांसह शेतकऱ्यांचा ठाण्यात ठिय्या
नांदगाव खंडेश्वर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यास आलेल्या सर्वेक्षकांना हाकलून लावणाऱ्या शेतकऱ्यांनाच मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी अटक केल्याने शेतकऱ्यांचा रोष उफाळून आला आणि नांदगाव परिसरात शनिवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आ. वीरेंद्र जगताप यांनी पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या सुटकेसाठी ठिय्या दिल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडा अन्यथा आम्हालाही अटक करा, अशी मागणी इतर शेतकऱ्यांनी लाऊन धरली. मात्र, यावर तोडगा न निघाल्याने उद्या सोमवारनंतर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास नकार दिला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही स्टुब कन्सलटन्सी, मुंबईच्या सर्वेक्षकांनी शेतजमिनींचे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केल्याने शनिवारी शेतकरी आक्रमक झालेत.
सर्वेक्षकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असता पोलिसांनी शेतकऱ्यांना अटक केली. यामुळे वातावरण चिघळले होते.

सर्वेक्षकाविरुद्धही तक्रार
नांदगाव खंडेश्वर : आ. वीरेंद्र जगताप यांच्यासह माजी जि.प.सदस्य तुकाराम भस्मे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन सर्वेक्षकांना अटक करण्याची मागणी लावून धरली. नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकरी इच्छुक नाहीत. मात्र, शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता स्टुब कन्सलटन्सी कंपनी, मुंबईच्या सर्वेक्षकांनी शनिवारी शेतकऱ्यांच्या जमिनींचे सर्वेक्षण केले. शेतकऱ्यांनी याला मज्जाव केला. त्यामुळे कंपनीचे सर्वेक्षक व शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. पश्चात सर्वेक्षकांनी मंगरूळ चव्हाळा येथील शेतकऱ्यांविरूद्ध मंगरूळ पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार नोंदविली. पोेलिसांनी या तक्रारीच्या आधारे दोन शेतकऱ्यांना अटक केली.
स्टुब कंपनीचे सर्वेक्षक विपुल उमरानिया यांच्या तक्रारीवरून शेतकऱ्यांना अटक झाल्याने परिसरातील वातावरण चिघळले. घटनेची माहिती मिळताच आ. वीरेंद्र जगताप व माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम भस्मे यांनी शेकडो शेतकऱ्यांसह मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्यात धडक दिली. अटक झालेल्या रूपराव शिरभाते व राजेश जोंधळे या दोन शेतकऱ्यांची तातडीने सुटका करण्यात यावी, ही मागणी जगताप व भस्मे यांनी रेटून धरली.
काही वेळाने उपरोक्त दोन्ही शेतकऱ्यांनीदेखील कंपनीच्या सर्वेक्षकांविरुद्ध विनापरवानगी शेतात येऊन शेतमालाची नासधूस केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली. मात्र, या तक्रारीवर कोेणतीच कारवाई करण्यात आली नाही. मात्र, अटक केलेल्या शेतकऱ्यांवर भादंविच्या कलम ३२४ नुसार मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
शिवणी, मंगरूळ, सालोड, धामक, वेणी गणेशपूर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी आ. वीरेंद्र जगतापांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्यात तळ दिला. परिस्थितीचे गांभीर्य पाहता अटक करून मंगरूळ पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या रूपराव शिरभाते व राजेश गोंधळे यांची नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली. त्यामुळे तणावात अधिकच भर पडली.
शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या जमिनींचे सर्वेक्षण करणाऱ्यांना झुकते माप देऊन पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप करीत एक तर अटक झालेल्या शेतकऱ्यांना सोडा किंवा आम्हाला अटक करा, अशी मागणी यावेळी आ. जगतापांसह शेतकऱ्यांनी केली. यावेळी बब्बूभाई सलाम जयदीप काकडे, भानुदास मंदुरकर, ओंकार ढोके, संतोष वैद्य, मोरेश्वर शिरभाते, देवेंद्र सव्वालाखे, धर्मराज परळीकर, रघुपती गावंडे, डोमाजी राजमुळे, विजय चिंचे, उमेश पुरे आदी शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलाच निर्णय घेणार नसल्याचे सांगते तर दुसरीकडे नोटीस न देता शेतात एनजीओ पाठवून बळजबरी करते. शासन शेतकऱ्यांना संपविण्याचा डाव रचत आहे. मात्र, हा डाव हाणून पाडू.
-वीरेंद्र जगताप, आमदार

द्रुतगती महामार्गात शेतकऱ्यांची जमीन गेल्यास शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधनच नष्ट होईल. शेतकरीच जर जमीन देण्यास तयार नसतील तर मग ही जबरदस्ती कशासाठी, हा प्रकार योग्य नाही.
-तुकाराम भस्मे,
माजी जिल्हा परिषद सदस्य

Web Title: Resistance to counting the land, farmers protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.