आज महापालिकेची आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 00:22 IST2016-10-07T00:22:05+5:302016-10-07T00:22:05+5:30
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार ७ आॅक्टोबरला सकाळी स्थानिक टाऊन हॉलमध्ये आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

आज महापालिकेची आरक्षण सोडत
शिक्कामोर्तब : राजकारण्यांची मांदियाळी
अमरावती : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार ७ आॅक्टोबरला सकाळी स्थानिक टाऊन हॉलमध्ये आरक्षण सोडत काढली जाणार आहे. याचवेळी प्रभागरचनाही जाहीर होईल. समस्त राजकारण्यांचे या सोडतीकडे लक्ष लागले असून उत्कंठता शिगेला पोहोचली आहे.
शुक्रवार ७ आॅक्टोबरला महापालिका निवडणुकींच्या अनुषंगाने नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग निश्चित करण्यात येईल. ४३ प्रभागांचे २२ प्रभागांमध्ये झालेले रुपांतर सार्वजनिक होईल. कुठल्या प्रभागाला कोणता भाग जोडला, कोणता तोडला, हे चित्र स्पष्ट होणार असल्याने नेहरू मैदानात राजकारण्यांची गर्दी राहणार आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत एकूण ८७ पैकी १५ जागा अनुसूचित जातींसाठी, २ जागा अनुसूचित जमातींसाठी, तर २३ जागा इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असेल. ४७ जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. २२ प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार असून याविषयीची आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात येऊन शालेय मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण निश्चित केले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने सर्वसाधारण आणि आरक्षित जागांमध्येही ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील.
निवडणूक आयोगानुसार प्रभागरचनेचा पारुप नकाशा १० आॅक्टोबरला प्रसिद्ध होईल. मात्र सोडतीच्या दिवशी आरक्षणाची माहिती समजावी, यासाठी शुक्रवारी नकाशे लावले जातील. २२ प्रभागांचा नकाशा टाऊन हॉलमध्ये लावला जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारीच प्रभाग रचनेचा सस्पेन्स संपुष्टात येईल., आरक्षणासोबतच बहुप्रतीक्षित प्रभाग रचनेचा ‘मॅप’ इच्छुकांची मांदियाळी खेचण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. (प्रतिनिधी)
प्रभाग रचनेचा प्रस्थापितांना फटका?
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना एकाही प्रस्थापित नेत्यांसाठी सोईची नसल्याचे बोलले जात आहे. प्रत्येकजण आपआपल्या सोईचा अंदाज वर्तवत आहेत. पहिल्या १० प्रभागाची रचना एकाही मावळत्या नगरसेवकाला सोपी नसल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी या चर्चेला पूर्णविराम मिळणार असून ‘वास्तव’ चित्र स्पष्ट होणार आहे. झाडून साऱ्या राजकारण्यांची प्रभागरचनेबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.