जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर

By Admin | Updated: October 6, 2016 00:21 IST2016-10-06T00:21:10+5:302016-10-06T00:21:10+5:30

जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे.

Reservation of Zilla Parishad Groups | जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर

जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर

सोडत : दिग्गजांना फटका, अनेकांना लॉटरी
अमरावती : जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. त्याअनुषंगाने दोन महिन्यांपासून झेडपीच्या सर्कल आरक्षणाचे वेध राजकीय पुढाऱ्यांना लागले होते. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांचे आरक्षण बुधवार ५ आॅक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या जिल्हा परिषदेतील दिग्गजांना आरक्षणाने आणखी हादरा दिला आहे. कित्येक वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या या नेत्यांवर त्यांचे हक्काचे गट आरक्षित झाल्याने घरी बसण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमुळे जिल्ह्यातील विविध पक्षाच्या राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांमध्ये ‘कही खुशी कहीं गम’ असे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये महिलांसाठी ३० जागा आधीच राखिव झाल्या आहेत. मात्र, कोणते गट राखिव होणार याकडे लक्ष लागले होते. ईश्वरचिठ्ठीने आरक्षणाची सोडत श्रेया रवींद्र वानखडे या चिमुकलीच्या हस्ते काढण्यात आली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यामध्ये अनु.जाती ११ गट राखिव झाले. यामध्ये ६ गट महिलासाठी आरक्षित आहेत तर ५ गट पुरूषांसाठी राखिव झाले आहेत. अनु. जमातीकरिता १२ गट राखिव ठेवण्यात आले आहेत. यात प्रत्येकी ६ महिला व पुरूषांकरिता आहेत. नामाप्रसाठी १६ जागा राखिव आहेत. यात प्रत्येकी ८ गट महिला व पुरूषांकरीता राखिव आहेत. याशिवाय सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण २० जागा असून यापैकी १० जागा महिलांकरिता राखिव आहेत. यामध्ये जि.प.च्या अनेक पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनाही फटका बसला आहे. आरक्षण सोडतीच्या ठिकाणी झेडपीच्या मातब्बर पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी होती. यातील अनेक गट आधीच महिलांकरिता राखिव होते. मात्र, ज्या पदाधिकाऱ्यांचे गट आरक्षित नव्हते अशांना अखेरच्या संधीची प्रतीक्षा होती. परंतु अनेकांचा भम्रनिरास झाला आहे. आता एकतर नवा गट शोधणे किंवा घराच्या महिलांना पुढे करून पडद्यामागची भूमिका निभावणे हाच पर्याय या पुढाऱ्यांपुढे शिल्लक आहे. आरक्षण सोडतीला निवडणूक विभागाचे कर्मचारी प्रमोद देशमुख, प्रकाश माहूरे, निलेश ढगे, नवनाथ तायडे, सिद्धार्थ नवाळे, उईके यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)

Web Title: Reservation of Zilla Parishad Groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.