८४० सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:41+5:302021-02-05T05:25:41+5:30
अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यानंतर गावोगावी सरपंचपदाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच ...

८४० सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यानंतर गावोगावी सरपंचपदाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच जिल्हा निवडणूक विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील ५५३ ग्रामपंचायतींसह अन्य २८७ अशा एकूण ८४० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम २८ जानेवारी रोजी जाहीर केला आहे. यानुसार जिल्ह्यातील १४ तहसीलस्तरावर सरपंच पदाकरिता येत्या २ व ४ फेब्रुवारी रोजी सोडत काढली जाणार आहे. याकरिता प्रत्येकी दोन तालुक्याचे नियंत्रण अधिकारी म्हणून संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक केली आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संबंधित तालुक्याचे तहसीलदार काम पाहणार आहेत.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ८४० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ५५३ ग्रामपंचातींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये १६ ग्रामपंचायतींसह इतर ठिकाणी एका सदस्यपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ४७७ सदस्य पदे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे ५३७ ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये ४३९७ सदस्यपदांसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यामुळे आता जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी नव्याने खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या जिल्ह्यातील एकूृण ८४० ग्रामपंचायतींसाठी महिला आरक्षणासह विविध प्रवर्गातील सरपंच आरक्षण सोडतीची सर्व कार्यवाही तहसीलदार यांच्यास्तरावर केली जाणार आहे तसेच सरपंच आरक्षण सोडतीकरिता संबंधित उपविभगाचे उपविभागीय अधिकारी यांना प्रत्येकी दोन तालुक्याचे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबविताना फिजिकल डिस्टन्सींग,मास्कचा वापर व सॅनिटायझरचा वापर करणे व शासनाने काेरोना विषाणू ( कोविड -१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
बॉक्स
असा आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
तालुका सोडतीचा दिनांक
अमरावती- २ फेब्रुवारी
नांदगाव खंडेश्वर- ४ फेब्रुवारी
तिवसा- २ फेब्रुवारी
भातकुली- ४ फेब्रुवारी
चांदूर रेल्वे- २ फेब्रुवारी
धामणगाव रेल्वे- ४ फेब्रुवारी
मोर्शी- २ फेब्रुवारी
वरूड- ४ फेब्रुवारी
दर्यापूर- २ फेब्रुवारी
अंजनगाव सुजी- ४ फेब्रुवारी
चांदूर बाजार- २ फेब्रुवारी
अचलपूर- ४ फेब्रुवारी
धारणी- २ फेब्रुवारी
चिखलदरा- ४ फेब्रुवारी