स्वस्त धान्य दुकानदार होणार बँक प्रतिनिधी
By Admin | Updated: January 6, 2017 00:20 IST2017-01-06T00:20:58+5:302017-01-06T00:20:58+5:30
रेशन दुकानदार व किरकोळ केरोसीन दुकानदारांना आर्थिक स्थैर्य मिळावे,

स्वस्त धान्य दुकानदार होणार बँक प्रतिनिधी
केंद्र शासनाचे आदेश : जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू
अमरावती : रेशन दुकानदार व किरकोळ केरोसीन दुकानदारांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी (बिझनेस करस्पाँडंस) म्हणून काम करण्याची संधी केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. रेशन दुकानदारांना व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना बँकेच्या ठेवी गोळा करणे कर्जदार शोधणे व कर्ज वसुलीचे काम मिळणार आहे. यावर त्यांना मानधन मिळणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रेशन दुकान व रॉकेल विक्रेत्यांना व्यावसायिक प्रतिनिधीसंदर्भात जिल्हा प्रशासनाला आदेश दिलेत. ही योजना राबविण्यासाठी जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्याची सूचनाही केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त केली आहे. यात लिड बँकेचे प्रबंधक, जिल्हास्तरीय राष्ट्रीय सूचना केंद्राचे प्रतिनिधी (एनआयसी) जिल्ह्यातील बँकांचे प्रादेशिक प्रमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी, मायक्रो एटीएम तंत्रज्ञान पुरविणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी समिती कार्यरत झाली आहे. रेशन व्यवस्था आधार कार्डशी लिंक केल्याने व वार्षिक एक लाख रुपयांची अट घातल्याने रेशनवरील लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. स्वयंपाकासाठी मुबलक गॅस मिळू लागल्याने रॉकेलचा पुरवठा कमी होऊ लागला आहे. रॉकेलमुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे रेशन दुकानदार व रॉकेल विक्रेत्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. रेशनच्या दुकानात बहुतांश व्यक्ती महिन्यातून एकवेळ भेट देत असतात. रेशन दुकानदार व रॉकेल विक्रेत्यांचे जाळे देशभर पसरले आहे. रेशन दुकानदारांना अधिक लाभ व्हावा व बँकींग व्यवस्था बळकट व्हावी यासाठी केंद्र सरकारने रेशन दुकानदारांना व्यावसायिक प्रतिनिधी तयार करण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेसाठी इच्छुक रेशन दुकानदारांकडून संमतीपत्र घेतले जाणार आहे. त्यानंतर या रेशन दुकानांची जबाबदारी बँकांना देण्यात येणार आहेत. रास्त भाव दुकानात व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना महिन्यातून कमीत कमी १० दिवस सेवा देणे अनिवार्य राहणार आहे. व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना दुकानदारांना बँकांनी त्यांच्या धोरणानुसार मानधन द्यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील रेशन दुकानात बायोमेट्रिक मशीन बसविण्यात येणार आहे. तसेच या दुकानदारांना अथवा त्यांच्या घरातील मुलांना व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाचे काम सुरू केले आहे.
- बी. के. वानखडे,
जिल्हा पुरवठा अधिकारी