अमरावती जिल्ह्यातील 'त्या' चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:53 IST2020-05-16T14:52:20+5:302020-05-16T14:53:09+5:30
चंद्रपूर येथील पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या एका नातेवाईकाने धामणगाव शहरात प्रवेश केल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील ५० जणांना होम क्वारंटाईन केलेल्या त्या चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने धामणगाव शहर सध्यातरी सेफ असल्याची सुखद वार्ता आहे.

अमरावती जिल्ह्यातील 'त्या' चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चंद्रपूर येथील पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या एका नातेवाईकाने धामणगाव शहरात प्रवेश केल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील ५० जणांना होम क्वारंटाईन केलेल्या त्या चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने धामणगाव शहर सध्यातरी सेफ असल्याची सुखद वार्ता आहे.
रेड झोन यवतमाळ येथे काही दिवस मुक्कामाला असलेली महिला चंद्रपूर येथे चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळली. ज्या व्यक्तीकडे हा रुग्ण मुक्कामी होता, त्या व्यक्तीचे थ्रोट स्वॅब घेऊन यवतमाळ येथे होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, सदर चालक असलेल्या व्यक्ती बुधवारी मालवाहू ट्रक घेऊन धामणगाव शहरात आला होता. या ट्रकमधून माल उतरविणाऱ्या तथा जवळपासच्या ५० लोकांच्या तो संपर्कात आल्याची माहिती प्रशासनाला मिळताच त्यांना घरी क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी सदर चालकाचा थ्रोट स्वॅब अहवाल यवतमाळ येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातून प्राप्त झाले. यात सदर चालकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी दिली.
जनता कर्फ्यू पाळण्याचे निर्देश
शनिवार, १६ मे रोजी दुपारी ३ वाजतापासून रविवार पूर्ण दिवस व सोमवार, १८ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू तालुक्यात पाळण्यात येत आहे. या दरम्यान तालुक्यातील कोणत्याही ग्रामस्थांनी धामणगाव शहरात येऊ नये, तसेच शहरातील नागरिकांनी रस्त्यावर फिरताना दिसल्यास किंवा कॉलनीवासीयांनी दुकान उघडल्यास थेट पोलीस कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती धामणगावचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी दिली.