सीमा नैतामांसह दोषींंविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:35 IST2018-09-26T22:34:48+5:302018-09-26T22:35:25+5:30
महादेव खोरीतील रहिवासी नितीन बगेकर यांचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम व महापालिकेच्या संबंधित दोषी अधिकाºयांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी तक्रार बुधवारी नगरसेवक आशिष गावंडे यांच्यासह युवा स्वाभिमानने फे्रजरपुरा पोलिसांत केली.

सीमा नैतामांसह दोषींंविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महादेव खोरीतील रहिवासी नितीन बगेकर यांचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम व महापालिकेच्या संबंधित दोषी अधिकाºयांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी तक्रार बुधवारी नगरसेवक आशिष गावंडे यांच्यासह युवा स्वाभिमानने फे्रजरपुरा पोलिसांत केली.
वडाळीच्या एसआरपीएफ प्रभाग क्रमांक ९ मधील रहिवासी नितीन बगेकर (३०) यांचा मंगळवारी डेंग्यूने मृत्यू झाला. शहरात डेंग्यूच्या प्रकोपाने अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत. मात्र, अद्याप महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आलेली नाही. नगरसेवक या नात्याने आशिष गावंडे यांनी अनेकदा महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाला तक्रारी केल्या. मात्र, आरोग्य अधिकारी सीमा नैताम व कर्मचारी यांनी सुधारणी केल्या नसल्याचा आरोप गावंडे यांनी केला आहे. गावंडे यांनी अनेकदा त्यांच्या प्रभागात पाहणी केली व स्वच्छता करवून घेतली. डेंग्यू डांसाच्या निर्मूलनासाठी धूरळणी व फवारणी करण्यासाठी अनेकदा महापालिकेच्या आरोग्य विभागाला सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नितीन बगेकर यांचा मृत्यू नैताम व महापालिका यांच्या नाकर्तेपणामुळेच झाला. अशा मृत्यूबाबत अधिकाºयांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी तक्रार नगरसेवक आशिष गावंडे यांनी ठाणेदार आसाराम चोरमले यांच्याकडे केली.
यावेळी नगरसेवक गावंडेंसह अभिजित देशमुख, अश्विन उके, गणेश मारोडकर, रवींद्र चौरपगार, पंकज चोपडे, निखिल सातनूरकर, अनूप थोरात, रूपेश पुरी, अविनाश आमले, गोवर्धन गाडे, अरुण दहाड व संतोष झापर्डे आदी उपस्थित होते.
बगेकर कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी
मजुरी करणारे नितीन बगेकर (३०, रा. महादेवखोरी) यांचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यांची एनएस-वन तपासणी पॉझिटिव्ह आली होती. शहरात आतापर्यंत डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद महापालिकेकडे आहे, तर खासगी क्षेत्रात चार जण दगावल्याची नोंद आहे. याशिवाय जिल्ह्यात आतापर्यंत २०६ पॉझिटिव्ह आढळले आहेत. नितीन बगेकर यांना २२ सप्टेंबर रोजी ताप आला. त्यांना डॉ. समीर चौधरी यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. तेथे औषधोपचार झाला. २४ सप्टेंबर रोजी रक्तजल नमुन्याची तपासणी करण्यात आली. त्यात एनएस-वन तपासणी पॉझिटिव्ह आली. २४ सप्टेंबर रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना डॉ. सुभाषचंद्र पाटणकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. नितीन बगेकर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. पत्नी, आई-वडील व एक अपंग भाऊ यांची जबाबदारी तेच सांभाळत होते. नितीन बगेकर यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीय निराधार झाले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
महापालिकेकडून
२५ लाखांचा दंड करा वसूल
नितीन बगेकर यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून २५ लाखांची रक्कम दंडस्वरूपात महापालिकेकडून वसूल करण्यात यावी. ती दंडाची रक्कम नितीन बगेकर यांच्या कुटुंबियांना देण्यात यावी, अशीही मागणी गावंडे यांनी पोलीस तक्रारीतून केली आहे.
आरोग्य विभागाशी संबंधित तक्रार आहे. वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कारवाईची दिशा ठरवू. तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेलाही पत्र देऊ.
- आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक, फे्रजरपुरा ठाणे.