गाडगेनगर पोलिसांची तक्रार नोंदविण्यास हयगय
By Admin | Updated: June 25, 2016 00:05 IST2016-06-25T00:05:22+5:302016-06-25T00:05:22+5:30
शेजारच्या घरी चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला तब्बल तीन तास प्रतीक्षा करावी लागली.

गाडगेनगर पोलिसांची तक्रार नोंदविण्यास हयगय
सीपींकडून पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी : तक्रारकर्ता तीन तास प्रतीक्षेत
अमरावती : शेजारच्या घरी चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला तब्बल तीन तास प्रतीक्षा करावी लागली. तक्रारकर्त्याने अखेर पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधून आपबिती कळविली. त्यामुळे गाडगेनगर ठाण्याचा भोंगळ कारभार उघड झाला. यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
रामपुरी कॅम्प परिसरातील रहिवासी कैलास पोपटानी यांच्या बंद घरात चोरी झाल्याचे शेजारीच राहणाऱ्या मोहित भोजवानी यांच्या लक्षात आले. यासंदर्भात ते गुरुवारी सकाळी गाडगेनगर पोलीस गाठून तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, संबंधित पोलीस अधिकारी फोनवर व्यस्त असल्याचे भोजवानी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी काही वेळ प्रतीक्षा केली. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी संबंधित कर्तव्यावर असलेले एएसआय यांना तक्रार घेण्यास पुन्हा लक्षात आणून दिले. मात्र, एएसआयच्या हातचा फोन काही सुटेना. अखेर ३ तासांनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी भोजवानी यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे पोलिसांच्या अशा कारभाराला कंटाळून अखेर भोजवानी यांनी थेट पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या फोनवर सपर्क केला. त्यांनी भोजवानी यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर तेथील पोलीस निरीक्षक अर्जून ठोसरे यांच्याशी फोनवर संपर्क करून या प्रकाराची जाण करू दिली. असे प्रकार खपवून घेणार नसल्याची तंबी पोलीस आयुक्त ठोसरे यांना दिली. त्यानंतर भोजवानी यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली.
अनेकदा फोन आऊट आॅफ सर्व्हीस
गाडगेनगर पोलीस ठाण्यातील फोन क्रमांक अनेकदा व्यस्त असतो. त्यातच अनेकदा हा फोन क्रमाक आऊट आॅफ सर्व्हीस दाखवितो. मात्र, जाणूनबूजन या ठाण्यातील फोनचे रिसीव्हर उचलून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच संबधीत फोन लाईनचा वायर काढून ठेवल्यास आऊट आॅफ सर्व्हिस हा संदेश ऐकण्यास सुध्दा मिळत असल्याचे आढळून आले आहे.