कठड्यांचा दर्जा निकृष्ट, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवा
By Admin | Updated: May 24, 2015 00:30 IST2015-05-24T00:30:09+5:302015-05-24T00:30:09+5:30
कित्येक लोकांचे बळी जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या बाभळी येथील धोकादायक पुलाला नगरपालिकेने निकृष्ट दर्जाचे ...

कठड्यांचा दर्जा निकृष्ट, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवा
मागणी : दर्यापूरचा ‘तो’ पूल ठरतोय जीवघेणा
दर्यापूर : कित्येक लोकांचे बळी जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या बाभळी येथील धोकादायक पुलाला नगरपालिकेने निकृष्ट दर्जाचे कठडे बसविल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जयंत वाकोडे यांनी दर्यापूरच्या मुख्याधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
विविध समस्यांनी ग्रस्त बाभळीवासीयांना नदीपात्रातून कसेबसे वाटचाल करीत बनोसा शहर गाठावे लागत होते. वर्षभर बाभळीवासी या नदीतून मार्गक्रमण करुन बनोसाची बाजारपेठ गाठत असत.
बाभळीच्या नागरिकांनी सोय व्हावी म्हणून त्याकाळी नगरपरिषदेने हा छोटा पूल बाभळीवासीयांच्या सेवेसाठी बांधून दिला. तोपर्यंत या ठिकाणी एकाही व्यक्तीने जीव गमवला नव्हता. परंतु पूल झाल्यापासून आजपर्यंत कधी पुलावरुन पाय घसरुन तर कधी डोहात पडून अनेकांचे बळी गेले आहे. धोकादायक पुलावर संरक्षक कठडे बांधण्यासाठी काही नगरसेवकांनीच विरोध केला होता असा आरोप जयंत वाकोडे यांनी केला आहे. परंतु मनसेने आपली मागणी रेटून धरल्यामुळे नगर पालिका प्रशासनाला त्याठिकाणी कठडे लावण्यासाठी मुहूर्त सापडला. कठडे लावण्याची इच्छाच नसलेल्या काही नगरसेवकांमुळे मुख्याधिकारी पानझाडे यांनी कसेबसे कठडे उभे केले. यासंदर्भाची चौकशी वरिष्ठांनी करावी, असे जयंत वाकोडे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
अनेकांचे बळी घेणारा पूल
दर्यापूर- बाभळी येथील जुळ्या शहरांना जोडणारा हा पूल अतिशय धोकादायक असून गणपती विसर्जन असो की, दुर्गा विसर्जन या काळात येथे अनेकांचे बळी गेले आहेत. कुणी नदीच्या डोहात पडून तर कुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे.परंतु नगर पालिका प्रशासनाने या जीवघेण्या पुलावर थातूरमातूर कठडे लावून नागरिकांच्या जिवाशी एकप्रकारे खेळच चालविला आहे.