पुन्हा परतला आनंदीचा आनंद!
By Admin | Updated: November 16, 2014 22:42 IST2014-11-16T22:42:09+5:302014-11-16T22:42:09+5:30
घराच्या अंगणात सवंगड्यांसह खेळता, खेळता सापडलेला चमकदार मणी (डायमंड) चिमुरडीच्या नाकात गेला. काढण्याचा प्रयत्न केला असता तो अधिकच आत सरकला, श्वास घेणे कठीण झाले.

पुन्हा परतला आनंदीचा आनंद!
सुटकेचा श्वास : नाकपुडीत अडकला होता मणी
अमरावती : घराच्या अंगणात सवंगड्यांसह खेळता, खेळता सापडलेला चमकदार मणी (डायमंड) चिमुरडीच्या नाकात गेला. काढण्याचा प्रयत्न केला असता तो अधिकच आत सरकला, श्वास घेणे कठीण झाले. पित्याने लगेच तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. येथील डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून तो खडा नाकातून बाहेर काढला आणि चिमुरडीच्या पित्यासह बघ्यांनीही सुटकेचा श्वास सोडला.
आनंदी प्रवीण बोरकर (३, रा. मासोद) असे चिमुकलीचे नाव आहे. शहरालगतच्या छोट्या गावात राहणारी आनंदी नेहमीप्रमाणे घराच्या आवारात खेळत होती. शेजारचे सवंगडीही तिच्यासोबत खेळत होते. खेळता-खेळता आनंदीला छोट्या दगडाच्या आकाराचा एक चमकदार मणी सापडला. हिऱ्याप्रमाणे चमकदार मण्याशी खेळण्यात आनंदी रममाण झाली. काही वेळाने तिने तो मणी नाकाच्या कोपऱ्यावर लावून धरला. नाकातील चमकीप्रमाणे चमकणारा तो मणी पाहून तिच्या मैत्रिणी देखिल आनंदीत झाल्या. मात्र, क्षणात तो मणी नाकपुडीत ओढला गेला. आनंदीला श्वास घेणे अवघड झाले. त्यामुळे तो मणी नाकातून काढण्याचे प्रयत्न आनंदीने सुरु केले. मात्र नाकात मणी निघत नसल्यामुळे तिचा जीव कासाविस होऊ लागला. आनंदीने जोरजोरात रडणे सुरू केले. वडिलांनी बाहेर येऊन बघितले असता त्यांच्या लक्षात घटेनेचे गांभीर्य आले. त्यांनी स्वत:च खडा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, खडा नाकपुडीच्या आत सरकू लागला. त्यांनी तत्काळ आनंदीला दुचाकीवर बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर पाटील यांनी लगेच खडा नाकाबाहेर काढला. डायमंड नाकातून बाहेर काढताच आनंदीच्या वडीलांनी सुटकेचा श्वास सोडला. रूग्णालयात बघ्यांची गर्दी जमली होती. नाकातून खडा बाहेर काढताच आनंदीच्या चेहऱ्यावर अचानक हास्य फुलले.