महापालिका शाळांचे नव्याने नामकरण
By Admin | Updated: July 21, 2016 00:05 IST2016-07-21T00:05:05+5:302016-07-21T00:05:05+5:30
महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च प्राथमिक शाळांचे लवकरच नामकरण होणार आहे.

महापालिका शाळांचे नव्याने नामकरण
६६ प्राथमिक, माध्यमिक शाळा : १९ शाळांमध्ये सेमीइंग्रजी शिक्षण सुरु होणार
अमरावती : महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च प्राथमिक शाळांचे लवकरच नामकरण होणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाकडून आमसभेत आणण्यात आला असून लवकरचा आमसभेत शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे संकेत आहेत.
महापालिका ६६ शाळांचे संचालन करते. या शाळांमध्ये ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यात २९ प्राथमिक, ३२ उच्च प्राथमिक व ५ माध्यमिक शाळा आहेत. मराठी माध्यमांच्या ३८, हिंदी माध्यमाच्या १२ व उर्दू माध्यमाच्या १६ शाळांचा समावेश आहे. यातील १९ शाळांमध्ये इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या या शाळा क्रमांकांना ओळखल्या जातात. रुख्मिनीनगर, वडाळी, भाजीबाजार अशी या शाळांची ओळख असून १७ नंबर, १९ नंबर अशा नावाने या शाळा ख्यातीप्राप्त आहेत. मात्र पाल्य व पालकांना ‘या या क्रमांकाच्या शाळेत’ आपला मुलगा शिकतो, असे सांगणे योग्य वाटत नाही, तसे निरिक्षण शिक्षण विभागाने नोंदविले आहे. त्या पार्श्वभूमिवर या सर्व शाळांचे नामकरण त्या-त्या परिसराच्या नावे होणार आहे. महापालिका आमसभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब अपेक्षित आहे. याशिवाय एकाच प्रांगणात असलेल्या महापालिकेच्या शाळा एकत्रित करण्यावरच्या प्रस्तावावरही चर्चा अपेक्षित आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी महापालिका शाळांचा दर्जात्मक वाढ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
उर्दू शाळेचे पालकत्व देशमुखांकडे
रुक्मिणीनगर महापालिका शाळेचे पालकत्व घेवून या शाळेचा चेहरामोहरा पटलविण्यास यशस्वी झालेले आ. सुनील देशमुख हे अजून एक शाळा दत्तक घेणार आहेत. जमीन कॉलनी येथील मनपा उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ८ ही शाळा आ. देशमुख यांना दत्तक तत्वावर देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
शेखावतांकडून दोन शाळा दत्तक
महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते बबलू शेखावत यांनी मनपाच्या दोन शाळा दत्तक घेण्याचा संकल्प सोडला आहे. शाळा दत्तक घेण्याचा मानस व्यक्त करणारे शेखावत पहिले नगरसेवक ठरले आहेत. मनपा उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक ६ व मनपा मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १३ चपराशीपुरा ही शाळा सभागृह नेता बबलू शेखावत यांना दत्तक तत्वावर देण्याबाबत प्रशासनाकडून प्रस्ताव टाकण्यात आला आहे.