देपे यांच्याकडून नियमबाह्य खर्च वसुलीचे आदेश

By Admin | Updated: July 9, 2014 23:13 IST2014-07-09T23:13:00+5:302014-07-09T23:13:00+5:30

येथील सामाजिक वनीकरणातील उपसंचालक गंगाधर देपे यांनी मलई ओरपण्यासाठी केलेल्या नियमबाहय खर्चाची रक्कम वसूल करण्याचे आदेश उपमहासंचालकांनी दिले आहे. एवढेच नव्हे तर अमरावती व अकोला

Remuneration orders for Deepay | देपे यांच्याकडून नियमबाह्य खर्च वसुलीचे आदेश

देपे यांच्याकडून नियमबाह्य खर्च वसुलीचे आदेश

गणेश वासनिक - अमरावती
येथील सामाजिक वनीकरणातील उपसंचालक गंगाधर देपे यांनी मलई ओरपण्यासाठी केलेल्या नियमबाहय खर्चाची रक्कम वसूल करण्याचे आदेश उपमहासंचालकांनी दिले आहे. एवढेच नव्हे तर अमरावती व अकोला येथे भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी शासनाला कारवाई करण्यासंदर्भाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
देपे यांनी नियम गुंडाळून अवाजवी रक्कम खर्च दाखवून प्रचंड अपहार केल्याची वृत्त मालिका ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आली. या वृत्तमालिकेची गंभीर दखल घेत सामाजिक वनीकरणाचे उपमहासंचालक आर.एन. राय यांनी देपे यांना नोटीस बजावून खर्च करण्यात आलेल्या रक्कमेबाबतचे स्पष्टीकरण मागितले. मात्र देपे यांनी सादर केलेले स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचे राय यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे राय यांनी लेखापरीक्षक कार्यालयाने यापूर्वी खर्चावर घेतलेल्या आक्षेपानुसार देपे यांच्याकडून ती रक्कम वसूल करुन तिजोरीत जमा करावी, असे आदेशित केले आहे. देपे यांनी केलेल्या कामातही अनियमितता असल्याच्या पार्श्वभूमीवर याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करावी, असे शासनाला कळविले. त्यामुळे आता देपे यांच्यावर निश्चितपणे कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे. देपे यांच्याकडे अकोला येथील प्रभार असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटिकेत बळकटीकरण व आधुनिकीकरणाच्या नावाने ६६ हजार २०० रुपयांची नियमबाह्य कामे केल्याचा ठपका लेखा परीक्षक कार्यालयाने ठेवला आहे. मध्यवर्ती रोपमळे, वन महोत्सव, पानवहाळ, संगणक दुरुस्ती, प्रचार प्रसिद्धीच्या नावे ५ लाख, ७७ हजार, ९४३ रुपये मंजूर अनुदानाव्यतिरिक्त खर्च करण्यात आले आहे. आयडब्लूएमपी अंतर्गत पानलोट, साहित्य खरेदी, सोलर दिवे खरेदीत गडबड झाल्याचे लेखा परीक्षकांनी म्हटले आहे. अमरावती येथील रोपवाटिकेतील वनकुटीच्या नूतनीकरणाच्या नावे हरियाली योजनेतून खर्च दाखविण्यात आला आहे. हरियाली योजना राबविण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून अनुदान प्राप्त होते. हे अनुदान खर्च करण्यासंदर्भात नियमावली ठरविण्यात आली आहे. तरीदेखील देपे यांनी वनकुटीत शाही मुक्काम ठोकता यावा, यासाठी वातानुकूलित यंत्र, दिवाण, गादी, रंगरंगोटी व डागडुजी करुन नियमबाह्य खर्च करण्याचा प्रताप केला आहे. येथे शासकीय इमारतीत मुक्काम असताना घरभाडे भत्तादेखील देपे यांनी उचल केल्याचे रेकॉर्डवर नमूद आहे. भंगार झालेली वाहने दुरुस्तीच्या नावाखाली लाखोंची उचल केली आहे. ही वाहने भंगारात जमा झाली असताना ती वाहने चक्क औरंगाबाद येथून दुरुस्त करण्यामागे केवळ देपे यांची अपहार प्रवृत्तीच कारणीभूत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देपे यांनी नियमबाहय खर्च केल्याच्या रक्कमेवर लेखा परीक्षक कार्यालयाने आक्षेप नोंदविल्यानंतरही मागील वर्षभरापासून त्यांना वरिष्ठांकडून अभय मिळत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीला केवळ २० दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे हे प्रकरण अंगलट येऊ नये, याकरिता उपमहासंचालक आर. एन. राय यांनी देपे यांनी केलेल्या नियमबाह्य खर्चाची रक्कम तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक वनीकरणाने उपसंचालक देपे यांच्याकडून रक्कम वसुली करण्याबाबची कार्यवाही सुरु केली आहे.

Web Title: Remuneration orders for Deepay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.