रिमोट कंट्रोलने वीज चोरी करून स्मार्ट समजणाऱ्यांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST2021-07-18T04:10:23+5:302021-07-18T04:10:23+5:30
अमरावती : थेट हूक टाकून वीज चोरी करणे, मीटरमध्ये फेरफार करून मीटर संथ करणे यासोबतच रिमोट कंट्रोलने वीज चोरी ...

रिमोट कंट्रोलने वीज चोरी करून स्मार्ट समजणाऱ्यांचे धाबे दणाणले
अमरावती : थेट हूक टाकून वीज चोरी करणे, मीटरमध्ये फेरफार करून मीटर संथ करणे यासोबतच रिमोट कंट्रोलने वीज चोरी करून स्वत:ला स्मार्ट समजणाऱ्या वीज चोरांवर महावितरण शहर विभागाच्यावतीने केलेल्या कारवाईत ४३ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने रिमोटने वीज चोरी करून स्मार्ट समजणाऱ्या वीज चोरांचेही धाबे दणाणले आहे.
शहरात मीटर संथ करणारी, तसेच मीटरमध्ये रिमोट कंट्रोलची किट बसविणारी टोळी सक्रिय झाली असल्याने शहरात स्मार्ट वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महावितरणकडून वीज चोरी पकडण्यासाठी मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या पुढाकाराने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत ९३ वीज चोरांनी २,३२,५०० युनिटची वीज चोरी केली असल्याचे आढळून आले. त्यामुळे या वीज चोरांवर ४३ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३९.८९ लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. महावितरणच्या या विशेष मोहिमेत रिमोट कंट्रोल, तसेच मीटर संथ करणाऱ्या टोळीसाठी सापळा रचण्यात आला असून, त्यांच्या विरोधात थेट फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. वीज चोरीची दंडात्मक रक्कम न भरणाऱ्या ५ ग्राहकांवर फौजदारी दाखल करण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केली आहे. याशिवाय वीज चोरीची दंडात्मक रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा कायमचा खंडित करण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांच्या नेतृत्वात आणि शहरातील तीनही उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंते प्रदीप अंधारे, संजय कुटे आणि संजय गिरी यांच्या विशेष सहभागाने सुरू असलेली महावितरणची विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, या मोहिमेत नियोजनबद्ध संशयित ग्राहकांवर छापा टाकून कारवाई करण्यात येणार आहे.
बॉक्स :
अशी केली कारवाई
९३ वीज चोरांपैकी २४ वीज चोर हे शहर उपविभाग १, उपविभाग-२ मधील ४७ आणि उपविभाग -३ मधील २२ वीज चोरांचा समावेश आहे. थेट वीज चोरी करणाऱ्या या ग्राहकांचे वीज मीटर तपासले असता वीज चोरीचे अफलातून प्रकार उघडकीस आले आहे. मीटरमध्ये रिमोट किट बसवून दुरूनच मीटर बंद करणे, मीटरमध्ये चीप बसवून मीटर संथ करणे, मीटरला मागच्या बाजूने होल करून मीटरमध्ये रेजिस्टंट तयार करणे, तसेच मीटर बायपास करून थेट वीज पुरवठा घेणे असे अफलातून प्रकार उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ९३ पैकी १० ग्राहक रिमोटद्वारे वीज चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय तीन ग्राहक थेट हूक टाकून वीज चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे.