याद राखा, येथेच गुटख्याचे गोडावून करु !

By Admin | Updated: August 1, 2016 23:55 IST2016-08-01T23:55:48+5:302016-08-01T23:55:48+5:30

पोलिस आणि एफडीएच्या हफ्तेखोरीमुळे फोफावलेल्या गुटख्याचा काळाबाजारीवर १५ दिवसात अंकुश घाला, ..

Remember, knock on the gutkha! | याद राखा, येथेच गुटख्याचे गोडावून करु !

याद राखा, येथेच गुटख्याचे गोडावून करु !

बच्चू कडूंचा खणखणीत इशारा : सहायक आयुक्तांना गुटखा भेट
अमरावती : पोलिस आणि एफडीएच्या हफ्तेखोरीमुळे फोफावलेल्या गुटख्याचा काळाबाजारीवर १५ दिवसात अंकुश घाला, अन्यथा तुमचे कार्यालय गुटख्याचे गोडावून करु, असा खणखणीत इशारा आ.बच्चू कडू यांनी एफडीएच्या सहआयुक्तांना दिला. सोमवारी दुपारी नाल्यात सापडलेला गुटखा साठा घेवून कडू यांनी एफडीएचे कार्यालय गाठले. आ. बच्चू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एफडीए कार्यालयाला गुटख्याचे तोरण बांधले. तथा सहआयुक्त मिलींद देशपांडे यांना गुटख्याची प्रतिकात्मक भेट दिली. देशपांडेनी यावेळी आ. कडूंचा रुद्रावतार अनुभवला.
सोमवारी दुपारी आ. कडू समर्थकांसह अमरावतीकडे येत असतांना परतवाड्यालगतच एका नाल्यात त्यांना गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. सुगंधित तंबाखूचा तो गुटखा घेवून आ. बच्चूंनी थेट एफडीएचे कार्यालय गाठले व सहआयुक्त देशपांडे यांचे दालन गाठून त्यांना जाब विचारला. गुटखा व सुगंधित तंबाखूने भरलेल्या या ट्रकचा काहींनी पाठलाग चालविल्याने भितीपोटी ट्रक चालकाने त्यातील संपूर्ण साठा नाल्यात फेकून दिला. तो ट्रक अनियंत्रित झाला असता तर खरवाडी प्रकरणाची पुनरावृत्ती होवू शकली असती, अशा शब्दात आ. कडू यांनी संताप व्यक्त केला. जिल्ह्यात सर्वदूर गुटख्याची विक्री होत आहे. हफ्ते घेवून तुम्ही नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे.

पोलीस आणि एफडीएची हफ्ताखोरी
पोलीस आणि एफडीएच्या हफ्तेखोरीमुळे गुंडाना नवे कुरण मिळाले आहे. प्रत्येक ठाणेदार आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांना महिन्याकाठी लाखो रुपये हफ्ता दिला जातो. हफ्ताखोरीने पैसा कमावण्याच्या या नव्या कुरणावर अंकुश घालावा अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा दम बच्चू कडू यांनी भरला.

गुंड पोसले जात आहेत !
पोलिस आणि एफडीएच्या हफ्तेखोरीमुळे गावोगावी गुंड पोसले जात आहेत. गुटख्याच्या काळाबाजारीला एसपी लखमी गौतमही तेवढेच जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला. गुटखा जप्त करण्याचे मुख्य काम एफडीएचेच आहे. मदत म्हणून पोलिसांची भूमिका असताना दोघांनी संगणमतांनी गुटखाबंदीचा फज्जा उडविल्याचा आरोप त्यांनी केला.

तर यंत्रणा सक्षम करा ना !
सहआयुक्तांनी अल्पमनुष्यबळाचे रडगाणे गायिले. त्यावर गुटखाबंदी करण्यापूर्वी यंत्रणा सक्षम करा ना ! असा सल्ला आ. कडू यांनी दिला. दोन कोटी झाडे एका दिवशी लावल्या जातात. तर गुटखाबंदीची अंमलबजावणी का होत नाही, असा रोकडा सवाल त्यांनी केला.

देशपांडे म्हणाले, कारवाई करतो
अमरावती : तो बंद करा, अन्यथा जिल्ह्यात सर्वदूर खुलेआम विक्री होणारा गुटखा जमा करुन तुमचे कार्यालय गुटख्याचे गोडावून करु, असा संतप्त इशारा दिल्यावर देशपांडे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आज सभ्यता पाळतो आहे, १५ दिवसांनी तुम्हालाही कोंडू, अशी ताकिद त्यांनी दिली. आ. कडू यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अमरावती शहर आणि लगतच्या काही ठिकाणची नावे सांगून आम्हाला माहिती आहे, तुम्हाला का दिसत नाही, अशा प्रश्न केला. आंदोलनावेळी देशपांडेच्या कार्यालयात उपस्थित असलेल्यांचे डोळे सुगंधित तंबाखूतील रसायनाच्या दर्पमुळे पाणावले होते. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू, सुरेश गणेशकर, मनोज जयस्वाल, जोगेंद्र मोहोड, रवी पाटील, अंकुश जवंजाळ, दीपक भोंगाडे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Remember, knock on the gutkha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.