अमरावती : राज्याच्या परिवहन खात्याने मे महिन्यात मोटार वाहन निरीक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविली असली तरी यात प्रचंड त्रुटी, अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. परिणामी, या बदली प्रक्रियेविरुद्ध ५१ वाहन निरीक्षकांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)कडे धाव घेत २७ मे २०२५ रोजी दिलासा मिळविला. मात्र, ४० दिवसांनंतरही वाहन निरीक्षक हे अद्यापही ‘वेट ॲण्ड वॉच’ आहेत. त्यामुळे परिवहन खात्याचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते.
परिवहन खात्याने पारदर्शकपणाच्या नावावर २८ जून २०२३ रोजी ऑनलाइन बदलीची प्रक्रिया सुरू केली. यात समुपदेशनात गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्गवारीनुसार बदली प्रक्रिया राबविणे अपेक्षित होते. मात्र, यंदा ऑनलाइन बदली प्रक्रियेची ‘एसओपी’ तयार न करता परिवहन खात्याने पारदर्शकतेलाच छेद दिल्याचा आरोप वाहन निरीक्षकांनी केला आहे. ही बाब मोटार वाहन निरीक्षकांनी ‘मॅट’मध्ये पुराव्यानिशी सिद्ध केली. त्यामुळे ‘मॅट’ने एकाच वेळी ५१ वाहन निरीक्षकांच्या बदली प्रक्रियेला स्थगनादेश देत प्रादेशिक परिवहन आयुक्तांना याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, २७ मे ते ७ जुलै २०२५ या ४० दिवसांत वाहन निरीक्षकांच्या बदली प्रक्रियेसंदर्भात कोणतीही दखल घेण्यात आली नाही, तर दुसरीकडे अन्यायग्रस्त मोटार वाहन निरीक्षक नव्याने पदस्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत.
परिवहन आयुक्तांकडून प्रतिज्ञापत्रास विलंब का?परिवहन आयुक्त कार्यालयाने २०२३ मध्ये मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचे निकष जाहीर केले. यात कायदेशीर त्रुटी व दोषांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची बाब ‘मॅट’च्या निदर्शनास आणून दिली. परिणामी, ‘मॅट’ने परिवहन आयुक्तांंना मोटार वाहन निरीक्षकांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ या वर्गवारीनुसार यादी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी, असे निर्देशित केले. असे असताना परिवहन आयुक्तांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यास विलंब होत आहे.
"‘मॅट’च्या निर्देशानुसार माेटार वाहन निरीक्षकांच्या बदल्यांसंदर्भात उत्तर पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतिज्ञापत्र लवकरच सादर केले जाईल. मध्यंतरी आजारी असल्यामुळे मी सुटीवर होतो, याबाबत थोडा विलंब झाला आहे."- संजय मेत्रेवार, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) परिवहन विभाग, मुंबई.