कठोर संचारबंदीत आजपासून शिथिलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST2021-06-01T04:10:56+5:302021-06-01T04:10:56+5:30
अमरावती : आठ दिवसांपासून संसर्गामध्ये घट झाल्याने आता कठोर संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ ...

कठोर संचारबंदीत आजपासून शिथिलता
अमरावती : आठ दिवसांपासून संसर्गामध्ये घट झाल्याने आता कठोर संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू राहत होती, त्यांना आता दुपारी २ पर्यंत मुभा मिळाली आहे. सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक दुकाने याच कालावधीत सुरू राहतील. मात्र, शनिवार आणि रविवारी बंद राहतील. दुपारी ३ नंतर संचारबंदी लागू करण्यात आल्याने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाता येणार नाही. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी सायंकाळी जारी केले.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यांपासून सुरू झालेली आहे. या काळात २१ फेब्रुवारीपासून लावण्यात आलेले कमी-अधिक प्रमाणातील संचारबंदीचे निर्बंध आतादेखील सुरू आहेत. विशेष म्हणजे, सध्या कोरोनाचा संसर्ग घटला आहे. याशिवाय सहा दिवसांत पाच ते सात टक्क्यांदरम्यान पॉझिटिव्हिटी असल्याने संचारबंदीचे सर्व निर्बंध हटणार, असे वाटत असताना, जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त शिथिलता दिल्याने नागरिकांसह व्यापारी वर्गाची घोर निराशा झाली आहे.
अत्यावश्यक सेवेतील सध्या सुरू असलेली सर्व प्रकारची शासकीय कार्यालये वगळता इतर कार्यालये, निमशासकीय कार्यालये व महामंडळांमध्ये २५ टक्के कर्मचारी ठेवून कामकाज करता येईल. याशिवाय अभ्यागतांचा प्रवेश मर्यादित ठेवावा लागणार आहे.
संचारबंदीच्या काळात नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये. ग्राहकांनी दुकानात खरेदीसाठी जातेवेळी पायी जावे अथवा सायकलचा वापर करावा. अत्यावश्यक कारणांशिवाय व रॅपिड अँटिजेनचा रिपोर्ट सोबत असल्याशिवाय प्रवास करू नये. खरेदी करण्याकरिता घरपोच सेवा, ई-काॅमर्स, ऑनलाईन सिस्टीमचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
बॉक्स
जीवनावश्यक दुकानांची वेळ वाढवली
किराना दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्री, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपेय विक्री, पिठाची गिरणी, दुग्धजन्य पदार्थ विक्री, दूध वितरण केंद्रे या सर्व सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहणार आहेत. याशिवाय शनिवार ते रविवार या कालावधीत बंद राहतील. याशिवाय सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार दररोज सकाळी ७ ते २ पर्यंत घरपोच सेवेकरिता सुरू राहणार आहेत.
बॉक्स
हॉटेल, रेस्टाॅरेंटद्वारे घरपोच सेवा
हॉटेल, रेस्टाॅरेंट, खानावळ व शिवभोजन थाळी यांची घरपोच सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. या ठिकाणी ग्राहक आढळून आल्यास संबंधित आस्थापनेविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.
बॉक्स
रेशन दुकान सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत
सर्व प्रकारची शासकीय रास्त दुकाने ही सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत वितरणाकरिता सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. संबंधित तहसीलदार तसेच शासकीय रास्त दुकानदार यांनी संलग्न लाभार्थींचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करावा व धान्य वितरणाकरिता टोकन सिस्टीमचा वापर करण्याचे निर्देश आहेत.
बॉक्स
नागरिकांना दुपारी ३ नंतर बाहेर निघण्यास मनाई
नागरिकांना दुपारी ३ नंतर अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. नियमांचा भंग केल्याचे निदर्शनात आल्यास सदर वाहन जप्त करण्यात येणार आहे. याशिवाय बाजार समित्या, फळबाजार, कृषिसेवा केंद्रे यापूर्वीच्या आदेशानुसार सुरू राहतील. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारे निर्बंध राहणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बॉक्स
या आस्थापना राहतील बंद
सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मंगल कार्यालये, बगीचे, सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय नाट्यगृह, प्रेक्षागृह या कालावधीत बंद राहतील. मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ आयोजित केल्याचे प्रथम आढळल्यास ५० हजारांचा दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी व चार महिन्यांकरिता ते सील करण्यात येणार आहे.
बॉक्स
मास्क नसल्यास आता ७५० रुपये दंड
चेहऱ्याला मास्क नसल्यास आता ७५० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. याशिवाय दुकाने व प्रतिष्ठानांमध्ये फिजिकल डिस्टन्स न पाळल्यास प्रथम ३५ हजार रुपये दंड व दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ही कारवाई करणार आहे.
बॉक्स
कोरोना चाचणी निगेटिव्हशिवाय जिल्ह्यात प्रवेश नाही
जिल्ह्याच्या सर्व सीमावर्ती भागांत पोलिसांद्वारे नाकेबंदी करण्यात येणार आहे, संबंधितांचा रॅपिड अँटिजेन चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय त्या व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश राहणार नाही. जिल्ह्याच्या सीमेवर वाहने रोखण्यात येतील. यात अंत्यसंस्कारासाठी जाणारी वाहने, वैद्यकीय, जीवनावश्यक व आपत्कालीन परिस्थिती आदी कारणांसाठी मनाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.