लॉकडाऊनमध्ये शिथिलता, उद्यापासून लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:30+5:302021-03-17T04:14:30+5:30

अमरावती : कोरोना संसर्गामध्ये वाढ होताच जिल्ह्यात जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आदेशामध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व ...

Relaxation in lockdown, applicable from tomorrow | लॉकडाऊनमध्ये शिथिलता, उद्यापासून लागू

लॉकडाऊनमध्ये शिथिलता, उद्यापासून लागू

अमरावती : कोरोना संसर्गामध्ये वाढ होताच जिल्ह्यात जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आदेशामध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहतील. याशिवाय अन्य प्रकारातही काही अंशी सूट देण्यात आली. हे आदेश १८ मार्चपासून लागू होतील. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेेश नवाल यांनी मंगळवारी जारी केले आहेत.

शासकीय कार्यालयात (अत्यावश्यक सेवा वगळता) २५ टक्के किंवा २५ कर्मचाऱ्यांना अनुमती देण्यात आली आहे. ग्राहकांनी वस्तू खरेदीसाठी जवळच्या बाजारपेठेचा वापर करावा. लॉजिंगचा व्यवसाय करणाऱ्यांना क्षमतेच्या ३३ टक्के मर्यादेत फक्त निवास व्यवस्थेकरिता परवानगी राहील. अभ्यागतांना पुरविण्यात येणारे खाद्यपदार्थ सीलबंद द्यावे लागणार आहे. या नियमांचा भंग झाल्यास संबंधित प्रतिष्ठान पाच दिवसांपर्यंत सील करून १५ हजारांच्या दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. याशिवाय हॉटेल, उपहारगृहे प्रत्यक्ष सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठीची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत लागू आहे. मात्र, प्रत्यक्ष आसनक्षमतेच्या ३३ टक्क्यांपर्यंतच जेवणासाठीची परवानगी राहील. सर्व दुकाने व आस्थापना यांना दर्शनी भागासमोर ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ असे फलक लावावे लागून त्याचे पालन करावे लागणार आहे. याशिवात ३० मार्चपर्यंत त्यांच्याकडील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून तसे प्रमाणपत्र स्थाानिक स्वराज्य संस्थांना द्यावे लागणार आहे. हा चाचणी अहवाल १५ जानेवारी ते ३० मार्च कालावधीतील असावा. प्रमाणपत्र सादर न केल्यास दुकान सील करण्यात येणार आहे.

बाॅक्स

नियमभंग झाल्यास पाच दिवस दुकान सील, आठ हजारांचा दंड

आदेशानुसार, दुकान व आस्थापनात मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरच्या वापरासोबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी अनिवार्य आहे. निर्देशांचे पालन न झाल्यास दुकान किंवा आस्थापना पाच दिवस सील करण्यात येऊन आठ हजारांचा दंड करण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे.

बॉक्स

लग्न समारंभासाठी वधू-वरांसह २५ व्यक्तींना परवानगी

लग्न समारंभासाठी वधू-वरांसह फक्त २५ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. बँड पथकासदेखील लग्नस्थळीच वाद्य वाजविण्याची परवानगी आहे. बँड पथकाची कमाल मर्यादा पाच व्यक्तींची आहे. लग्न समारंभात मिरवणुकीत परवानगी नाही. याशिवाय कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न झाल्यास, आयोजकास २० हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे.

बॉक्स

मालवाहतुकीस कुठलेच निर्बंध नाही

मालवाहतूक व वाहतुकीला निर्बंध नाहीत. तथापि, चारचाकी गाडीत चालकाव्यतिरिक्त तीन प्रवासी, तर तीनचाकी गाडीत (ऑटोरिक्षा) चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, तर दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवाशांना प्रवासाची परवानगी आहे. ठोक भाजीमंडईत पहाटे २ ते सकाळी ७ या कालावधीत व्यवहार होतील. मात्र, तिथे किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश असेल.

बॉक्स

शाळा-महाविद्यालये बंदच

महापालिका तसेच इतर शहरी व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद राहतील. खासगी शिकवण्या, कोचिंग क्लासेसला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत परवानगी आहे. मात्र, प्रत्येक बॅचमध्ये केवळ सात विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या आसनात किमान सहा फुटांचे अंतर तसेच दोन बॅचमध्ये एक तासांचे अंतर असणे गरजेचे आहे. दोन बॅचच्या मधल्या कालावधीत निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे.

बॉक्स

व्यायामशाळांना मुभा; थिएटरे बंद

सर्व चित्रपटगृहे व बहुविध चित्रपटगृहे, तरणतलाव, करमणूक उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षागृहे, सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने बंद राहतील. व्यायामशाळा व योग प्रशिक्षण केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. अशा केंद्रांत एका बॅचमध्ये केवळ सात व्यक्ती, त्यांच्यात सहा फुटांचे अंतर, दोन बॅचमध्ये एक तासांचे अंतर व मधल्या वेळेत निर्जंतुकीकरण बंधनकारक आहे.

Web Title: Relaxation in lockdown, applicable from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.