स्वस्त धान्य घेण्यास स्वेच्छेने देता येणार नकार
By Admin | Updated: October 20, 2016 00:08 IST2016-10-20T00:08:39+5:302016-10-20T00:08:39+5:30
गॅस सबसीडीप्रमाणे अंत्योदय (पिवळे) आणि प्राधान्य (केशरी) शिधापत्रिकाधारकांना स्वत: स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य नाकारता येणार आहे.

स्वस्त धान्य घेण्यास स्वेच्छेने देता येणार नकार
सबसीडी कमी होणार : ग्राहकांना अर्ज सादर करणे अनिवार्य
अमरावती : गॅस सबसीडीप्रमाणे अंत्योदय (पिवळे) आणि प्राधान्य (केशरी) शिधापत्रिकाधारकांना स्वत: स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य नाकारता येणार आहे. त्याकरिता ‘शिधापत्रिका हवी पण धान्य नको’ हा अर्जातील कॉलम भरून द्यावा लागेल. रेशन दुकानातील कोटा कमी करण्यासाठी हा शासनाचा प्रयत्न आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत महिन्याकाठी जिल्ह्यात जवळपास सहा लाख रेशनकार्डधारकांना धान्य वितरीत करावे लागते. हे धान्य वितरीत करताना शासनाला दरमहा कोट्यवधींचा निधी द्यावा लागतो. तरीही अनेक शिधापत्रिकाधारकांना रेशनचे धान्य मिळत नसल्याची ओरड कायम आहे. त्यामुळे आता शिधापत्रिकाधारकाच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक असल्यास अशा कुटुंबप्रमुखांना आता स्वेच्छेने रेशनचे धान्य नाकारता येणार आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने १३ आॅक्टोबर रोजी अध्यादेश जारी केला आहे. ही योजना अंत्योदय, प्राधान्य रेशनकार्ड धारकांसाठी लागू करण्यात आली आहे. स्वच्छेने धान्य नाकारून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षी केंद्र शासनाने श्रीमंत कुटुंबांना गॅस सबसीडी नाकारण्याचे आवाहन करताच जिल्ह्यातील ३० हजार ग्राहकांनी पहिल्या टप्प्यात गॅस सबसीडी नाकारली होती. आता राज्य शासनाने पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वच्छेने धान्य नाकारण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.
‘गिव्ह ईट अप’ यानुसार रेशन कार्डासाठी अर्ज सादर करताना शिधापत्रिकाधारकाला धान्य नाकारण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यात केवळ रेशन कार्ड दिले जाते. या नव्या निर्णयामुळे अन्नधान्य वितरण प्रणालीत सुसूत्रता येईल.
- डी.के.वानखडे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती.