केंद्रातील रिजेक्टेड तूर पडूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:14 IST2017-05-23T00:14:04+5:302017-05-23T00:14:04+5:30
नाफेडच्या खरेदी केंद्रावर पहिल्या दिवशी विक्रीकरिता आलेला तुरीचा माल रिजेक्ट केल्यावरही ‘ती’ तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आजही पडून असल्याने ....

केंद्रातील रिजेक्टेड तूर पडूनच
शेतकऱ्यांना खरेदीची प्रतीक्षा : ‘त्या’ व्यापाऱ्यावर प्रादेशिक व्यवस्थापकाची मेहेरनजर
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : नाफेडच्या खरेदी केंद्रावर पहिल्या दिवशी विक्रीकरिता आलेला तुरीचा माल रिजेक्ट केल्यावरही ‘ती’ तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आजही पडून असल्याने याचे गूढ रहस्य अद्यापही गुलदस्त्यात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
१२ एप्रिल रोजी धारणीत नाफेडतर्फे आदिवासी विकास महामंडळाद्वारे तूर खरेदी सुरू केली होती. पहिल्याच दिवसी हजारो पोते तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात आणल्या गेल्या. या तूर उत्पादकांमध्ये शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचीच गर्दी होती. आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकारी आणि व्यापाऱ्यात पूर्वीपासूनची गोड नाती जपण्यासाठी पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांचीच तूर बोगस सातबारा उतारे घेऊन विक्रीस आणले गेले होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने तूर उत्पादक शेतकरी व्यापाऱ्याच्या गराळ्यात पार विसरविण्यात आला.
पहिल्याच दिवशी आणल्या गेलेल्या तुरीपैकी काही शेतकरी कम व्यापाऱ्यांची तूर नाफेडच्या निकषाबाहेर गेल्यामुळे ते तूर रिजेक्ट करण्यात आले होते. त्यामुळे नियमानुसार संबंधितांनी आपले तूर कृउबासच्या यार्डातून लगेच घेऊन जावयास पाहिजे होते. परंतु ‘त्या’ तुरीच्या मालकाचे आणि प्रादेशिक व्यवस्थापकाचे साटेलोटे असल्यामुळे ‘ती’ तूर आजही त्याच जागेवर पडून आहे. याव्यतिरिक्त जवळपास एक हजार पोती तूर आजही खरेदीच्या प्रतीक्षेत असून खरेदी मात्र पूर्णपणे बंद पडलेली आहे. अशात यार्डात पडलेले तुरीचे भविष्य काय, याबाबत शेतकरी चिंतातूर झाला आहे.
शेतकऱ्यांचा आरोप
‘ती’ तूर नाफेडच्या पोत्यात मोजणी करून पडली आहे. पहिल्या दिवशी रिजेक्ट केलेली तूर नाफेडच्या पोत्यात ५० किलोप्रमाणे मोजणी करून ठेवली आहे. त्यामुळे वेळ मिळताच ‘त्या’ तुरीला अधिकृत करून खरेदी करण्याचा डाव अधिकारी रचत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
‘ती’ तूर रद्द केल्यावर संबंधितास तूर उचलून नेण्याबाबत वारंवार सांगण्यात आले आहे. मात्र, त्याने उचल न केल्याने आमचा नाईलाज झाला आहे.
- ए. व्ही.वसावे,
उपप्रादेशिक व्यवस्थापक,
आ. वि. महामंडळ