सुधारगृह, कारागृह व्हाया पोलीस ठाणे !

By Admin | Updated: February 1, 2016 00:07 IST2016-02-01T00:07:41+5:302016-02-01T00:07:41+5:30

अल्पवयीन असतानाच त्याने चोरीचे धडे घेतले. छोट्या-मोठ्या चोऱ्यांच्या माध्यमातून त्याने पैसाही कमविला.

Rehabilitation house, prison police station! | सुधारगृह, कारागृह व्हाया पोलीस ठाणे !

सुधारगृह, कारागृह व्हाया पोलीस ठाणे !

कुख्यात घरफोड्याचा प्रवास : मंगेशने चैनीसाठी केल्या चोऱ्या, पोलीस ठाण्यात राहून केले गुन्हे
प्रदीप भाकरे अमरावती
अल्पवयीन असतानाच त्याने चोरीचे धडे घेतले. छोट्या-मोठ्या चोऱ्यांच्या माध्यमातून त्याने पैसाही कमविला. पकडला गेल्यानंतर त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. तेथून परतल्यानंतर त्याच्यात सुधारणा व्हावी, या उद्देशाने त्याला पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आले. बघता-बघता तो मोठा झाला आणि पोलीस ठाण्यात कामे करुन फावल्या वेळात घरफोड्या करु लागला. अन् शेवटी तो पुन्हा एकदा कारागृहात पोहोचला.
१५ पेक्षा अधिक घरफोड्यांची कबुली देणाऱ्या मंगेश दिलीप वाघमारेंचा हा प्रवास पोलीस तपासात निष्पन्न झाला. २२ वर्षीय मंगेशकडून पोलिसांनी आतापर्यंत ९५ ग्रॅम सोने आणि ६० ग्रॅम चांदी हस्तगत केली. गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्त्वातील पथकाने मंगळवारी त्याला गस्तीदरम्यान पकडले. आरोपी मंगेशने लहान वयातच चोरीला सुरुवात केली. तपास अधिकारी कांचन पांडे यांनी ही माहिती दिली.
मंगेश १६ ते १७ वर्षांचा असताना तो चोरी करताना पकडला गेला. त्याची खासगी रिमांड होममध्ये रवानगी करण्यात आली. १८ वर्षांचा होताच त्याला सोडण्यात आले. मंगेश उर्फ करुट्या याच्यामध्ये सुधारणा व्हावी, त्यासाठी राजापेठच्या तत्कालिन ठाणेदारांनी त्याला ठाण्यातच ठेऊन घेतले. तेथे तो लहान-मोठी कामे करीत असे. दिवसभर काम केल्यानंतर मंगेश ठाण्यातील वऱ्हांड्यातच झोपायचा. काही दिवसांतच त्याची चोरीची सवय उफाळून आली. ठाण्यात राहात असताना त्याने पुन्हा चोऱ्या करण्यास सुरूवात केली. त्यातून त्याला गांजा आणि दारुची सवय लागली. निराधार मंगेशला सहा महिन्यांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आले. सप्टेंबर २०१५ मध्ये तो तुरुंगातून सुटला व पुन्हा त्याने चोरीचे सत्र सुरू केले. सप्टेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ दरम्यान त्याने १५ पेक्षा अधिक घरफोड्या केल्या. निव्वळ चैनीसाठी चोरी केल्याची कबुली देत आरोपी मंगेशकडून कांचन पांडे आणि त्यांच्या टीमने मुद्देमाल हस्तगत केला. तूर्तास तो राजापेठ पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलीस चौकशीदरम्यान त्याचा हा ५ ते ६ वर्षांचा थरारक चोरीचा प्रवास उलगडला.

६ गुन्ह्यांतील ऐवज जप्त
कुख्यात मंगेश ऊर्फ करुट्याकडून १५ घरफोड्यांची कबुली वदवून गुन्ह्यातील ऐवज जप्त करण्यात आला. कांचन पांडे यांच्या नेतृत्त्वातील पोलीस पथकात उपनिरीक्षक वेरुळकर, दीपक निवास, नीलेश गुल्हाने, चैतन्य रोकडे, संदीप देशमुख आणि इम्रानअली यांचा समावेश होता.

घराचे दार उघडे दिसताच तो चोरी करीत असे. एखादवेळी कुलूप तोडूनही तो चोरी करायचा. सुधारगृहातून बाहेर पडल्यानंतर चोरीचे सत्र सुरू केले.
- कांचन पांडे
सहायक पोलीस निरीक्षक,
गुन्हे शाखा

Web Title: Rehabilitation house, prison police station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.