२० गावांतील पुनर्वसन निधीअभावी रखडले
By Admin | Updated: December 9, 2014 22:42 IST2014-12-09T22:42:38+5:302014-12-09T22:42:38+5:30
२००७ मधील महापुराने बेघर झालेले १३१३ पुनर्वसनग्रस्त कुटुंब मदतीची अपेक्षा करीत असून शासनाने गेल्या सात वर्षांपासून या पुनर्वसनासाठी निधीच दिला नसल्यामुळे २० गावांतील पुनर्वसनग्रस्त बेघर आहेत.

२० गावांतील पुनर्वसन निधीअभावी रखडले
संदीप मानकर - दर्यापूर
२००७ मधील महापुराने बेघर झालेले १३१३ पुनर्वसनग्रस्त कुटुंब मदतीची अपेक्षा करीत असून शासनाने गेल्या सात वर्षांपासून या पुनर्वसनासाठी निधीच दिला नसल्यामुळे २० गावांतील पुनर्वसनग्रस्त बेघर आहेत. दर्यापूर तालुक्यातील पुनर्वसनग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्याना निवेदन देऊन या संदर्भात निधी मागणार असल्याचे मतदारसंघाचे आमदार रमेश बुंदिले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महापुरात २३ गावात १५४४ कुटुंब बेघत झाले. तत्कालिन डझनभर मंत्री तालुक्याचा दौरा करुन गेले. परंतु अद्यापही पुनर्वसनग्रस्तांना न्याय मिळाला नाही. यामधून तीन गावे व २३१ कुटुंब पुनर्वसनातून वगळण्यात आले. परंतु अद्यापही २० गावातल १३१३ कुटुंबांचा प्रश्न कायम आहे. आतापर्यंत ६० वर्षात फक्त ३० टक्के पुनर्वसन पूर्ण झाले असून ७० टक्के पुनर्वसन अद्यापही शासनाच्या उदासीन धोरणामुळे व लोकप्रतिनिधींच्या अपयशामुळे रखडले असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक कुटुंबाला घरे बांधणीसाठी १ लाखाप्रमाणे म्हणजे १३ कोटी १३ लक्ष रुपयांची आवश्यकता असताना आतापर्यंत प्रत्यक्षात वाटप ४ कोटी ९६ लक्ष १५ हजार रुपयांचा झाल्याचे शासकीय अहवाल आहे.
परंतु अद्यापही पुनर्वसन ग्रस्तांसाठी ८ कोटी १६ लक्ष ८५ हजार रुपयांची आवश्यकता असताना मात्र अनेक दिवसांपासून निधीच नसल्यामुळे पुनर्वसनग्रस्त हवालदील झाले आहे. अनेक वेळा पुनर्वसनग्रस्तांनी आंदोलने केली. उपोषणे केली. तहसील कार्यालयाचे भोवती चकरा मारल्या. परंतु त्यांचा आवाज कोणीही ऐकला नाही. पुनर्वसनानंतर लागणाऱ्या नागरिक सुविधा सुध्दा मिळालेल्या नसून जेथे पुनर्वसन झाले आहे तिथे वीज नाही. पाणी नाही, रस्ते नाहीत, अशी परिस्थिती झाली आहे. नागरिक सुविधेतील विजेसाठी १७ लक्ष ९८ हजार रुपयांची निधीची आवश्यक आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी ९३ लक्ष ९६ हजार रुपयांची मागणी शासनाला स्थानिक पातळीवरुन करण्यात आली आहे.
तालुक्यातील खल्लार शिवर, रामगाव, नरदोडा, नालवाडा, बेंबळा, बु. सावंगा खु., खानपूर चिपर्डा, तोंगलाबाद, नाचोना, लेहेगाव, गोळेगाव, रामतीर्थ, कान्होली, माहुली धांडे, हसनपूर, बाभळी, दर्यापूर, कोळंबी, खुर्माबाद आदी २० गावात १३१३ पुनर्वसन ग्रस्त कुटुंब असून अद्याप ७ वर्षापासून त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.