बांधकाम विभागात नियमबाह्य रॉयल्टी कपातीचा फंडा
By Admin | Updated: October 8, 2016 00:12 IST2016-10-08T00:12:10+5:302016-10-08T00:12:10+5:30
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव ते शिंदी या पांदण रस्त्याच्या तीन लाख रूपयांच्या खडीकरण कामात ...

बांधकाम विभागात नियमबाह्य रॉयल्टी कपातीचा फंडा
सभापतींनी ओढले ताशेरे : जिल्हा परिषद वित्त समिती सभेत आक्षेप
अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव ते शिंदी या पांदण रस्त्याच्या तीन लाख रूपयांच्या खडीकरण कामात चक्क १ लाख रूपयांची रॉयल्टी कपात केल्याचा विषय जि.प. वित्त समितीच्या सभेत शुक्रवारी गाजला.
या प्रकरणाची चौकशी करून माहिती सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष तथा वित्त सभापती सतीश हाडोळे यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. निर्णयानुसार विकासकामे करताना निधीच्या तरतुदीमधून वित्त विभागाकडून पारित होणाऱ्या देयकांमध्ये वेगवेगळी रॉयल्टी कपात केली जाते. यामध्ये प्रत्येकी १० टक्के रक्कम साहित्य गुणवत्ता चाचणी आणि आयकर व व्हॅट यासाठी एकूण २० टक्के रक्कम कपात केली जाते. मात्र जि.प.च्या बांधकाम विभागाने सादर केलेल्या वरील कामाच्या देयकातून ६० हजार रूपये कपात करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता ४० हजार रूपये मिळून एक लाख रुपयांची कपात केली. त्यामुळे संबंधित लहान कंत्राटदाराला केवळ २ लाख ६७० रूपये अदा केले आहे. यामध्ये अनियमितता करून संबंधितांनी आर्थिक स्वहित साधल्याचा आरोपीही त्यांनी केला. सर्व्हेक्षणासाठी मागील वर्षी सिंचन विभागाला सुमारे ८४ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यातही आर्थिक अनियमितता असल्याने याबाबत विभागीय आयुक्त तसेच एलसीबीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला उपाअध्यक्ष सतीश होडोळे, सदस्य मोहन पाटील, जयप्रकाश पटेल, मंदा गवई, जया बुंदिले, वनमाला खडके, मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, प्रवीण मोंढे, राजेंद्र नाकील, मनिष गिरी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)