सेवाकाळाचा अनधिकृत कालावधी विनियमित करा
By Admin | Updated: May 21, 2016 00:13 IST2016-05-21T00:13:32+5:302016-05-21T00:13:32+5:30
विभागीय चौकशीतून दोषमुक्त झाल्यानंतरही सेवाकाळाचा अनधिकृत कालावधी हा विनियमित करण्यात न आल्याने सेवानिवृत्तीच्या .....

सेवाकाळाचा अनधिकृत कालावधी विनियमित करा
सेवानिवृत्ताची मागणी : अनुरेखकाचा उपोषणाचा इशारा
अमरावती : विभागीय चौकशीतून दोषमुक्त झाल्यानंतरही सेवाकाळाचा अनधिकृत कालावधी हा विनियमित करण्यात न आल्याने सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अचलपूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अनुरेखक जे.व्ही. धनवडे यांचे सेवापुस्तक अद्ययावत झालेले नाही. याचा भविष्यावर होणारा परिणाम लक्षात घेता त्यांचा अनधिकृत कालवधी विनियमित करून सेवापुस्तक अद्ययावत करावे, अशी मागणी त्यांनी विभागीय कृषी सहसंचालकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
धनवडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार ते सुरूवातीपासून अचलपूर येथे कृषी अधिकारी कार्यालयात अनुरेखक होते. मात्र, संबंधित कार्यालयाकडून त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रथम नियुक्तीवेळी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र, पूर्ण चरित्र तपासणी, शैक्षणिक अर्हता, जातींबाबतचे प्रमाणपत्र आदींची पूर्तता करण्यात आली. मात्र, धनवडे यांच्याकडून दोन वेळा उपरोक्त बाबींची पूर्तता करून घेण्यात आली.
याबाबत २० मार्च २००६ रोजी त्यांनी जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात गोपनीय पत्राद्वारे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची माहिती दिली. खुलासाही केला होता. विभागीय चौकशी अधिकाऱ्यांनी ३१ मार्च २००६ रोजी धनवडे यांना दोषमुक्त केले. त्यानंतरही त्यांचा अनधिकृत कालावधी विनियमित करण्याबाबत संबंधित कार्यालयाने तत्परता दाखविली नाही. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या २५ मे २००७ रोजीच्या पत्रानुसार तालुका कृषी अधिकारी, चिखलदरा यांना अनधिकृत कालावधी नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे सुचविले. हा प्रस्ताव २२ नोव्हेंबर २००६ रोजी सादर झाला आहे. त्यानंतर याच कालावधीनंतर हा प्रस्ताव कृषी आयुक्तालय, पुणे यांना सादर करण्यात आला. मात्र, आठ वर्षांचा कालावधी लोटूनही या प्रस्तावावर कारवाई झालेली नाही.
३० जून रोजी जे.व्ही.धनवडे हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु त्यांचे सेवापुरस्तक अद्याप अद्ययावत नाही. वेतन पडताळणी देखील झालेली नाही. याशिवाय इतर अनेक नोंदी सेवापुस्तकात नाहीत. ही सर्व कामे अद्ययावत होऊन अनधिकृत कालवधी विनियमित करून त्यांचे सेवापुस्तक महालेखाकारांकडे सादर करावे, अन्यथा ३० मे पासून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर सपत्निक उपोषणाला बसण्याचा इशारा जे. व्ही. धनवडे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)