नियमित, एकाग्र अभ्यास हेच यशाचे गमक
By Admin | Updated: May 28, 2015 00:24 IST2015-05-28T00:24:07+5:302015-05-28T00:24:07+5:30
अभ्यासाकरिता जागरण कधीच केले नाही, मात्र, आठ तासांच्या झोपेनंतर एकाग्रतेने अभ्यास केल्यानेच मी हे यश ..

नियमित, एकाग्र अभ्यास हेच यशाचे गमक
श्रेया मांडवगडे : वैद्यकीय क्षेत्रात करणार करिअर
अमरावती : अभ्यासाकरिता जागरण कधीच केले नाही, मात्र, आठ तासांच्या झोपेनंतर एकाग्रतेने अभ्यास केल्यानेच मी हे यश संपादन करु शकले, अशा शब्दांत जिल्ह्यातून आणि विभागातूनही प्रथम येण्याचा मान प्राप्त करणारी ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी श्रेया जयदीप मांडवगडे हिने ‘लोकमत’ पुढे तिच्या यशाचे गमक उघड केले. उत्तुंग यशप्राप्तीनंतर वैद्यकीय क्षेत्रात जाऊन रूग्णसेवेचा तिचा मानस आहे.
लहानपणापासून आई-वडिलाच्या लाडात वाढलेली श्रेया अभ्यासात खूप हुशार आहे. त्यामुळे आई-वडिलांनी तिच्या अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. तिचे वडील जयदीप अकोला येथील नगररचना विभागात अभियंता पदावर कार्यरत आहेत. तर आई गृहिणी आहे. तिला आयुष नावाचा लहान भाऊ आहे. बारावीच्या अभ्यासाकरिता श्रेयाने दिवस-रात्र एक केले नाहीत. मात्र, तीने एकाग्रतेने अभ्यास केला. दररोज रात्री १०.३० वाजता झोपणे व पहाटे ६ वाजता उठून अभ्यास करणे ही तिची दिनचर्या होती. अभ्यासासाठी जागरण न करता आठ तासांची परिपूर्ण झोप आणि त्यानंतर अभ्यासावर लक्ष, असा तिचा दिनक्रम असे. पालकांनी अभ्यासासाठी तिला सुयोेग्य वातावरण उपलब्ध करून दिले. टीव्ही संच देखील बंद ठेवला.
श्रेया भगवान महावीरांना आराध्य दैवत मानते. त्यांच्याच कृपाप्रसादाने यश मिळाले, असे ती निर्भेळपणे कबुल करते. आई-वडिलांसह, आजी सुवासिनी महाजन, आजोबा रविकांत महाजन, मावशी मंजुषा ढोबळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य एस.बी. लोहिया, शिक्षक धर्माळे, नगमा खान, वानखडे मॅडम, शिक्षक राऊळकर यांना ती यशाचे श्रेय देते. वैद्यकीय क्षेत्राची पुढील करिअरसाठी निवड करण्याचा तिचा मानस आहे. विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता सातत्याने अभ्यास केल्यास यशाची प्राप्ती नक्कीच होते, असेही ती यावेळी म्हणाली. (प्रतिनिधी)