मुख्याधिकाऱ्यांविना नगरपंचायतींचा कारभार
By Admin | Updated: December 2, 2015 00:07 IST2015-12-02T00:07:41+5:302015-12-02T00:07:41+5:30
जिल्ह्यात नवनिर्मित चार नगरपंचायतींची प्रशासकीय राजवट सोमवारी ३० नोव्हेंबरला संपुष्टात आली.

मुख्याधिकाऱ्यांविना नगरपंचायतींचा कारभार
जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष : सोमवारी संपली, प्रशासकीय राजवट
अमरावती : जिल्ह्यात नवनिर्मित चार नगरपंचायतींची प्रशासकीय राजवट सोमवारी ३० नोव्हेंबरला संपुष्टात आली. मात्र, जिल्हा प्रशासनाने या नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती केली नाही किंवा अन्य अधिकाऱ्यांना प्रभारही दिलेला नसल्याने नगरपंचायतींचा पहिला दिवस मुख्याधिकाऱ्यांना विनाच पार पडला.
जिल्ह्यात तिवसा, भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर या चार तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायती स्थापन करण्यात आल्यात. एप्रिल महिन्यात या ग्रामपंचायती बरखास्त करून शासनाने संबंधित तहसीलदारांची नगरपंचायतींचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली व प्रशासकीय राजवटीच्या सहा महिन्यांच्या आत सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहे.
त्याअनुषंगाने १ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. तसेच ३० नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूकदेखील पार पडली.
या निवडणुकीनंतर प्रशासकीय राजवट संपली. तहसीलदार प्रशासकाच्या जबाबदारीतून मुक्त झाले.
वास्तविक नगरपंचायतींवर तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे नगरपंचायतींना मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे होते. मात्र, सहा महिने उलटूनही मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही.
आता तर प्रशासकांचा कार्यकाळ देखील संपुष्टात आला आहे. मात्र, मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती अथवा अन्य अधिकाऱ्यांकडे प्रभार न दिल्यामुळे नगरपंचायतींचा प्रशासकीय कारभार ठप्प पडला आहे. यासंदर्भात नगर प्रशासन विभागाच्या जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते नागपूरला गेल्याचे सांगण्यात आले.