प्रधानमंत्री योजनेचे पैसे वेतनातून कपात
By Admin | Updated: July 8, 2015 00:26 IST2015-07-08T00:26:16+5:302015-07-08T00:26:16+5:30
फिनले मिलच्या कामगारांची संमती न घेता पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्याने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत ...

प्रधानमंत्री योजनेचे पैसे वेतनातून कपात
अन्याय : पंजाब बँकेचा मनमानी कारभार
सुनील देशपांडे अचलपूर
फिनले मिलच्या कामगारांची संमती न घेता पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्याने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत पगारातून परस्पर कपात केल्याचे उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे, तर काही कामगारांनी यावर हरकत घेतल्याने त्यांचे पैसे पुन्हा त्यांच्या खात्यात जमा केले. बँकेच्या या मनमानी कारभारामुळे कामगार चक्राऊन गेले असून फिनले मिलचे प्रशासनही याबाबत बँकेला पत्र देऊन विचारणा करणार आहेत.
अचलपूर येथील फिनले मिलमध्ये ६५० कामगार तीन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) काम करतात. त्यांचे दर महिन्याचे वेतन परतवाडा येथील पंजाब नॅशनल बँकेतून होत असते. त्यांची कुठलीही संमती न घेता किंवा बँकेकडून असणाऱ्या फॉर्मवर स्वाक्षरी न घेता सदर बँकेने पंतप्रधान जीवन विमा सुरक्षा योजनेंतर्गत ११ जून रोजी त्यांच्या पगारातून परस्पर १२ रूपये कपात केली होती. यासाठी त्यांनी फिनले मिलच्या प्रशासनाची सुद्धा संमती घेतली नव्हती. ही कपात ६०० पेक्षा जास्त कामगारांच्या पगारातून केल्याची माहिती आहे.
आमच्या संमतीविना तुम्ही परस्पर पगारातून कपात कशी केली याचा जाब विचारण्यासाठी युवा कामगार व सामाजिक कार्यकर्ते विवेक महल्ले यांच्या नेतृत्वात विलास चावरे, सुशील मिश्रा, संदीप वनवे, आशिष सातपुते, अमोल सातपुते यांच्यासह आदी कामगार बँकेत धडकले. बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विचारणा करून लेखी निवेदन दिले.
काय आहे प्रधानमंत्री
सुरक्षा योजना ?
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत (पी.एम.एस.बी.वाय.) एका व्यक्तीकडून प्रतिमहिना १२ रूपये कापायचे असतात. या योजनेत सहभागी व्यक्तीला अपंगत्व आल्यास, अपघात झाल्यास दोन लाख रूपये देण्याची तरतूद शासनाने केली आहे. अपघात व अपंगत्वाचा प्रकार न घडल्यास शेवटी एक लाख रूपये मिळतात, अशी योजनेसंदर्भात अगदी थोडक्यात ही माहिती बँक प्रशासनाने दिली. या योजनेचा लाभ घेण्याचेही सुचविण्यात आले.
कामगारांच्या पगारातून योजनेसाठी केलेली कपात सिस्टीमनुसार होते. ही योजना त्यांच्या फायद्यासाठी आहे. आम्ही फिनले मिलमध्ये फॉर्म दिले होते. काहींना वाटले होते. ज्या कामगारांनी हरकत घेतली त्यांच्या खात्यात पुन्हा पैसे जमा केले. त्यांनी मागणी केली होती.
- मनोज महुदेकर,
शाखाधिकारी, पंजाब नॅशनल बँक.
नेमक्या किती कामगारांचे पैसे बँकेने कपात केले हे माहीत नाही. कुणालाच न सांगता व विनापरवानगीने परस्पर बँकेने कामगारांच्या बँक खात्यातून पैसे कपात केले. यासंदर्भात आम्ही बँकेला पत्र देऊन विचारणा करणार आहोत.
- आर. आर. भुतडा,
लेखाधिकारी, फिनले मिल.
पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचाऱ्यांनी फॉर्म आणून दिले होते. पण ही योजना काय आहे हे कामगारांना किंवा संबंधितांना समजावून सांगितली नव्हती.
- बी. पी. बागडे,
समयलेखक, फिनले मिल.
योजना चांगली आहे. पण बँकेच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी. कामगारांच्या खात्यातून पैसे कापणे, पुन्हा जमा करणे हे नियमबाह्य आहे.
- विवेक महल्ले,
युवा कामगार नेता.