पीक कर्जातून साडेतीन टक्के कपात
By Admin | Updated: June 14, 2015 00:15 IST2015-06-14T00:15:00+5:302015-06-14T00:15:00+5:30
मागील ३ वर्षांपासून राज्यात दुष्काळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत.

पीक कर्जातून साडेतीन टक्के कपात
शेतकऱ्यांची लूट : शासनाच्या आदेशाला तिलांजली
प्रभाकर भगोले चांदूररेल्वे
मागील ३ वर्षांपासून राज्यात दुष्काळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मात्र, अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही. त्यात भर म्हणून नवीन कर्ज देताना प्रोसेसिंग चार्ज लावून शेतकऱ्यांच्या हातात मिळालेल्या तुटपुंज्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेने सुरू केला आहे. कर्जातून तब्बल साडेतीन टक्के कपात करण्याचा हा प्रकार तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात सुरू असून यामुळे शेतकरी संतप्त आहेत.
चारही बाजूने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीककर्जातूनही साडेतीन टक्क्यांची कपात होत असल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. इतर खासगी कंपन्याप्रमाणे महाराष्ट्र बँकेनेही पीक कर्जातून प्रोसेसिंग चार्ज कापण्याचा प्रकार सुरू केला आहे. कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे शेतकऱ्याने गोळा केलेली असतात. साधी रेव्हेन्यू तिकिटही बँक लावत नाही. मग प्रोसेसिंग चार्ज कशाचा? असे बँक व्यवस्थापक भगत यांना विचारले असता त्यांनी संबंधित प्रतिनिधीला टोलवाटोलवीची उत्तरे दिली. तालुक्यातील इतर बँकांकडून अशी कुठलीही कपात केली जात नसल्याची चर्चा असल्याने बँक आॅफ महाराष्ट्रला ही कपात करण्याचे अधिकार कोणी दिले, असा संतप्त सवाल परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. हा प्रकार शेतकऱ्यांची लूट करणारा असल्याने तालुक्यातील सामाजिक संस्था व संघटनांनी या प्रकाराविरूध्द दंड थोपटले असून बँकेच्या या कारवाईचा जाब विचारण्याचा पवित्रा घेतला आहे.
मुख्य अधिकाऱ्यांच्या आदेशावरुन आम्ही तीन टक्के प्रोसेसिंग चार्जची कपात करतो. याबाबत सविस्तर माहितीसाठी अमरावतीच्या क्षेत्रीय शाखेशी संपर्क साधू शकता.
- प्रकाश भगत,
शाखाप्रबंधक, बँक आॅफ महाराष्ट्र, चांदूररेल्वे