लालपरी असुरक्षित; अग्निशमन यंत्र गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST2021-03-09T04:16:17+5:302021-03-09T04:16:17+5:30
अमरावती : अलीकडे राज्यात एसटी बसेसना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येथील मध्यवर्ती बसस्थानक व आगारात ...

लालपरी असुरक्षित; अग्निशमन यंत्र गायब
अमरावती : अलीकडे राज्यात एसटी बसेसना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येथील मध्यवर्ती बसस्थानक व आगारात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता काही बसमध्ये यंत्रणाच नसल्याचे चित्र पहायवयास मिळाले.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेचा प्रवास सुरक्षित मानला जातो. परंतु काही लांबपल्ल्याच्या व नव्याने ताफ्यात दाखल झालेल्या बसेसचा अपवाद सोडला तर काही लालपरी बसेसमध्ये आगीच्या खबरदारीसाठी उपाययोजना नव्हत्या. याशिवाय या बसमध्ये प्रथमोपचार पेटी नव्हती. सोबतच बसमध्ये वायफाय यंत्रणाही बंद असल्याचे पाहायला मिळाले. काही बसचे पत्रे फाटलेले होते. एसटी प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी अग्निशमन यंत्रणा कायम ठेवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने उपाययोजना आवश्यक आहे.
बॉक्स
प्रथम उपचारपेटी बेपत्ता
एसटी बसमध्ये कुठलाही अपघात झाल्यास अथवा आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना म्हणून प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. या पेट्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. ज्या उद्देशाने या पेट्या लावल्या गेल्या त्यालाच आता मूठमाती देण्यात आली आहे. मात्र, प्रथम उपचारपेटी नसली तरी प्रथमोपचारासाठी किट मात्र बसेसमध्ये उपलब्ध करून देण्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे.
बॉक्स
आगारात सुरक्षेसाठी गार्ड
अमरावती मध्यवर्ती आगारात कुठलाही व्यक्तींनी प्रवेश करू नये म्हणून चहूबाजूंनी सुरक्षारक्षक नियुक्त केले आहे. प्रवेशव्दारावर सुरक्षा रक्षक तैनात असून, बसस्थानक परिसर वगळता इतर परिसरात येणाऱ्यांचे मात्र चौकशी करून तशी नोंद घेतली जाते.
बॉक्स
वायफाय सुविधा गुंडाळली
एसटीमधून प्रवास करताना प्रवाशांना ऑनलाईन सुविधा मिळावी याकरिता एसटीने वाय-फायची व्यवस्था केली होती. याकरिता बसमध्ये यंत्रणासुध्दा कार्यान्वित केली होती. मात्र, अल्पावधीतच वायफाय सेवाही बंद पडली आहे.
बॉक्स
बसस्थानकाच्या आडोशाला स्मोकिंग झोन
बसस्थानकावर वाहने उभ्या असतात. मागील बाजूला कुणीच नसल्याचे संधी साधून विडी सिगारेट ओढणारे प्रवासी आडोशाला स्मोकिंग करताना आढळून येतात. यासोबतच गुटखा खाण्यासाठीही अशाच ठिकाणी आडोशाला जाऊन सिगारेट ओढली जात असल्याचे चित्र पहावयास मिळतात.
बॉक्स
एसटीची आतून दुरवस्था
बसमध्ये विविध समस्या पाहायला मिळतात. काही चालकांच्या स्टेरिंगजवळ पुरेशी अपडेट यंत्रणा नाही. काही बसेसमध्ये जुन्याच यंत्रणावर कामे भागविली जात आहे. त्यामुळे अशा बसेसमध्ये उत्तम सोई सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे.
बॉक्स
या बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नाही
एमएच ४०-वाय ५६९६
एमएच ४०-वाय ५३११
एमएच ४०-एन ८२०४
एमएच ४०-एन ८६३९
एमएच ४०-वाय ५८०३
कोट
काही बसेसचा अपवाद सोडला, तर बहुतांश एसटीबसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे. प्रथमोपचार पेट्या नाहीत. मात्र, किट वाहकाजवळ पुरविली जाते. वायफाय सुविधासुध्दा बंद आहे. ज्या वाहने आरटीओ पासिंगसाठी जातात, त्यांना विभागीय कार्यशाळेकडून नवीन अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून दिली जाते.
- संदीप खवडे,
आगार व्यवस्थापक