कचरा वहनासाठी भ्रष्ट एजन्सीला ‘रेडकार्पेट’ !
By Admin | Updated: October 17, 2016 00:07 IST2016-10-17T00:07:16+5:302016-10-17T00:07:16+5:30
मागील आठ वर्षांपासून शहरातील घनकचरा उचलणाऱ्या एजन्सीने कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा लेखाआक्षेप असतानाही..

कचरा वहनासाठी भ्रष्ट एजन्सीला ‘रेडकार्पेट’ !
‘आॅडिट आॅब्जेक्शन’ला ‘खो ’: कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप
अमरावती : मागील आठ वर्षांपासून शहरातील घनकचरा उचलणाऱ्या एजन्सीने कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा लेखाआक्षेप असतानाही त्याच एजन्सीला पुन्हा दीर्घ कालावधीसाठी कंत्राट देण्याचा घाट घालण्यात आला आहे. लेखाआक्षेपाच्या आधारे या एजन्सीला ‘ब्लॅकलिस्ट’ करणे अभिप्रेत असताना पुन्हा त्या एजन्सीची ‘आवभगत’ करण्यात आल्याने संशयकल्लोळ उठला आहे. यंत्रणेने कंत्राटावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी लेखाआक्षेप विचारात घेतले का किंवा जाणुनबुजून बघ्याची भूमिका घेतली? याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे.
दरम्यान ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविल्याचा दावा आरोग्य प्रशासनाने केला असला तरी महापालिका वर्तुळात मात्र त्याबाबत संशयकल्लोळ उठला आहे. सुमारे १२ ते १५ कोटी रूपयांचे हे कंत्राट आहे. एकीकडे कोटयवधींचे कंत्राट पूजा कंस्ट्रक्शनलाच मिळावे तर दुसरीकडे मिळूच नये, यासाठी दोन पदाधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षरित्या किल्ला लढविल्याचे सर्वश्रुत आहे.
महापालिका कार्यक्षेत्रातील प्रशासकीय झोनअंतर्गत निघणारा कचरा ट्रक व डंपर प्लेसरद्वारे उचलून सुकळी कंपोस्ट डेपो किंवा महापालिका सांगेल त्या ठिकाणी नेऊन टाकण्याचे कंत्राट पूजा कंस्ट्रक्शन, वर्धा या एजन्सीला मिळाल्यातच जमा आहे. तांत्रिक आणि आर्थिक बिडमध्ये पूजा कन्स्ट्रक्शन अव्वल ठरल्याने घनकचऱ्याचे कंत्राट त्यांनाच मिळेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. यापूर्वी २० नोव्हेंबर २००८ ते १९ नोव्हेंबर २०१३ कालावधीत पूजा कंस्ट्रक्शनकडेच महापालिका क्षेत्रातील कचरा वहनाचे कंत्राट होते. त्यानंतर याच एजन्सीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली.
दीड महिन्याआधी घनकचरा वहनासाठी निविदा ‘कॉल’ करण्यात आल्या. मागील आठवड्यात या ई-निविदा उघडण्यात आल्या.या निविदा प्रक्रियेला महापालिकेच्या अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. अशोका एन्टरप्रायजेस, मुंबई, बालाजी कन्स्ट्रक्शन, पूजा कन्स्ट्रक्शन, अमृत व पृथ्वी कन्स्ट्रक्शनने निविदा दाखल केल्या होत्या.
यापैकी पृथ्वी कन्स्ट्रक्शनच्या चव्हाण यांची निविदा ‘टेक्निकल बिड’ मध्ये बाद झाली. त्यानंतर शनिवारी फायनांशियल बिड उघडण्यात आली. यात ट्रिपनिहाय दर मागविण्यात आले होते. त्यात पूजा कन्स्ट्रक्शनचे दर सर्वात कमी असल्याने आणि अन्य तीन एजन्सीच्या तुलनेत ते उजवे ठरल्याने हे कंत्राट पूजा कन्स्ट्रक्शनला देण्यात येणार असल्याचे यंत्रणेने म्हटले आहे. कंत्राटावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यापूर्वी आयुक्तांनी पूजा कन्स्ट्रक्शनची ‘बॅक हिस्ट्री’ जाणून घेतली का किंवा त्यांना त्याबाबत अनभिज्ञ ठेवण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. लेखापरीक्षण अहवालात लेखापरीक्षकांनी घेतलेल्या आक्षेपांचे अनुपालन करण्याचा मुहूर्तही पालिकेला मिळालेला नाही.
आक्षेपवजा गैरव्यवहाराकडे कानाडोळा
पूजा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदारांनी गैरव्यवहार केल्याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. महिन्याकाठी ६००ते ७०० ट्रक अधिक कचरा निघाल्याचे कंत्राटदाराने दाखविले होते. तसेच महापालिकेतील संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्याचा पैसा पूर्णपणे कंत्राटदाराने उचलल्याबाबतची बाब महासभेतही उपस्थित करण्यात आली. मात्र, त्यांनतरही पालिकेने कुठलीही कारवाई केली नसल्याने नगरविकास विभागानेही यंत्रणेवर कोरडे ओढले होते.याशिवाय अन्य आक्षेपही घेण्यात आले आहेत. लेखापरीक्षणादरम्यान बँक गॅरंटीच्या अभिलेखांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
आयुक्तांनी घ्यावा निर्णय
शहरातील कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी निविदा बोलविण्यात आल्या. उपायुक्तांच्या नेतृत्वात तांत्रिक आणि आर्थिक बिड तपासण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया अद्याप अपूर्ण असल्याने पूजा कन्स्ट्रक्शनला कंत्राट मिळाले, असे म्हणता येणार नाही, असे आयुक्त हेमंत पवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.